बीड: बीड शहरात जाळपोळ, दगडफेक करून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने थेट जळगाव गाठले. २० दिवस झाल्याने आपल्याला कोणी पकडणार नाही म्हणून घरी आला. इकडे त्याच्या शोधात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला लागलीच बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी रात्री १० वाजता बीड शहरात केली. याच्याकडून जाळपोळीतील इतर अनेक तरुणांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
निखिल रांजवण (वय २०, रा. शिंदेनगर, बीड) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. यानेच सुभाष रोड व जालना रोडवर दगडफेक करण्यास सर्वांत आगोदर सुरुवात केली. आंदोलनात निखिल हा आक्रमक होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, मनोज वाघ, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम व एलसीबी टीमने केली.
अग्निशमन गाडी जाळणारा उघड
बीड शहरातील राजीव गांधी चौकात अग्निशमन दलाची गाडी जाळण्यात आली होती. ही गाडी जाळणाऱ्याचे नाव निखिलकडून उघड झाले आहे. हा गाडी जाळणारा आगोदरच पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु त्याने कबुली दिली नव्हती. आता आणखी आरोपींची नावे निखिलकडून उघड होणार असल्याचे सांगण्यात आले.
निखिल रांजवण याला अटक करण्यात आली आहे. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली जात आहे. काही साथीदारांची नावे त्याने सांगितली आहेत. त्याचाही जाळपोळीत अनेक ठिकाणी सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.-संतोष साबळे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड