बीड : महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणार्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रूपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या सुचनेवरून सध्या शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. रविवारी पहाटेही वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत होते. याचवेळी बालेपीर भागात त्यांना टायर घेऊन जाणारे पिकअप दिसले. पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. चौकशी करीत असतानाच पिकअपमधील चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत.
रविवारी दिवसभर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला. सायंकाळच्या सुमारास पळाल्या पैक्की शेख इलियास हा त्याच्या घरी लपल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती घेतली जात असून त्याचे साथिदार हे शेजारील जिल्ह्याचे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, तुळशीराम जगताप, शेख नसीर, प्रसाद कदम, संतोष कातखडे, प्रशांत सुसकर यांनी केली.
त्या तीन कर्मचार्यांचा सत्कारगस्तीदरम्यान वाहन पकडणार्या वाहतूक शाखेच्या रविंद्र नागरगोजे, मच्छिंद्र कप्पे, नितीन काकडे या तीन कर्मचार्यांचा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सत्कार केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची उपस्थिती होती.
इलियासला टायरची माहितीपोलिसांनी ताब्यात घेतलेला शेख इलियास हा पूर्वी हैदराबाद येथील आॅईलच्या कंपनीत होता. याठिकाणी टायर जाळून आॅईल काढले जात होते. त्यामुळे त्याला टायरची सर्व माहिती होती. यामध्ये भरपूर पैसा असल्याचे त्याला माहिती होते. त्यामुळेच त्याने इतर साथिदारांच्या सहाय्याने टायर चोरी सुरु केली.