दिंद्रुड : लेकीने मनोधैर्य वाढविल्यानंतर विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या वृद्ध माता-पित्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सकारात्मक विचारशैली ठेवली तर कोरोनाला हरवणे अवघड नाही, हेच माजलगाव तालुक्यातील आलापूर येथील जगन्नाथ हिवरेकर (७०) व त्यांच्या पत्नी शारदा हिवरेकर (६२) यांनी दाखवून दिले.
आलापूर येथील जगन्नाथ बापूराव हिवरेकर व त्यांची पत्नी शारदा जगन्नाथ हिवरेकर, नातू तुषार चंद्रकांत कुंभार हे तिघे २७ एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. मनात प्रचंड भीती व वार्धक्य यामुळे हिवरेकर कुटुंबातील सर्व सदस्य प्रचंड घाबरले होते. मात्र, त्यांची मुलगी राजश्री हिवरेकर ही स्वतः वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने तिने आई-वडिलांचे मनोधैर्य वाढविले. वेळोवेळी औषधोपचाराची सूचना केली. त्यामुळे आजार अंगावर न काढता तात्काळ आवश्यक तपासण्या केल्या. त्यामुळे लवकरात लवकर विलगीकरण करत डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार घेतले. यामुळे आजारातून बाहेर पडण्यास मदत झाल्याचे हिवरेकर दाम्पत्य सांगते. कोरोना रुग्णांना या आजाराविषयी मोठा गैरसमज आहे. या आजारात मन:स्वास्थ टिकवले व सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारल्यास त्रास कमी होतो व आजारातून सुटका होते, असे जगन्नाथ हिवरेकर म्हणाले.
कोरोना आजारात लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करणे आवश्यक आहे. वयोवृद्धांसाठी हा आजार त्रासदायक ठरतो; पण काळजीपूर्वक औषधोपचार, सकस आहार, प्राणायाम, व्यायाम आदींसह सकारात्मक विचारशैली अवलंबल्यामुळे माझ्या वयोवृद्ध आई-वडिलांनी कोरोनावर मात केली.
-राजश्री चंद्रकांत कुंभार, मुलगी.
===Photopath===
190521\img_20210519_153202_14.jpg