दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न जुमानता जो उद्योगधंद्यामध्ये पुढे जातो तोच खरा उद्योजक असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. ते दिंद्रुड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, सध्याचा तरुण सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. कामधंदे सोडून अवास्तव जीवनात भरकटत आहे. तसे न करता युवकांनी दिसेल तो व्यवसाय न घाबरता करणे गरजेचे आहे. व्यवसायात बऱ्याच अडचणी येतात. मात्र, जो न खचता व्यवसायात पुढे जातो तोच खरा उद्योजक बनतो असेही ते म्हणाले.
यावेळी प्राध्यापक रमेश गटकळ, उद्योजक महालिंग अप्पा मिटकरी, ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे, तेलगावचे सरपंच दीपक लगड, संगमचे सरपंच भगवानराव कांदे, दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, व्हरकटवाडीचे सरपंच रामकिसन व्हरकटे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. लघु उद्योगासाठी शासनाच्या अनेक योजना असून उद्योजकांनी प्रयत्न केल्यास बँकेकडून कर्ज उपलब्ध करीत विविध व्यवसाय करता येतात. आपल्या प्रगतीसाठी बदलत्या काळाचा वेध घेत युवकांनी उद्योगधंदे उभारावेत, असे मत प्रा. डॉ. रमेश गटकळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले. नागेश कानडे यांनी आभार मानले.