बीड : शहरात जवळपास ११ हजार विद्युत खांब असून या खांबावर एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी शासनाकडे वेळोवेळी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
सर्व नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या एनर्जी इफिसियन्सी सर्विस लिमिटेड इ.ई.एस.एल.च्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईडी दिवे बसविणेकरीता शासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांशी करारनामा करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाची कालबध्द अंमलबजावणी करण्यासाठी बीड शहरातील सर्व भागात एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. या करिता मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी करारनामा करण्याची कार्यवाही केली व नगर विकास विभागाने शहरात ही योजना राबविण्याच्या निर्णयास मंजुरी दिली.
सदरील कराराचा कालावधी ७ वर्षांकरीता आहे. एलईडी दिवे बसविण्याचे नागरिकांना दिलेले वचन नगर पालिकेमार्फत पूर्ण होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.