माजलगाव : अवैधरीत्या उपसा करून वाळू भरून जाणारा हायवा शिवनगाव बंधाऱ्याजवळ महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी पकडला होता. शिवणगाव, पायतळवाडी, सावरगाव यामार्गे तहसीलमध्ये जमा करण्यासाठी निघालेला हायवा रस्त्यातील सावरगाव जवळील एका पेट्रोल पंपाजवळ थांबला व तेथील एका शेतात वाळूमाफियाकडून मोठी मांडवली झाल्याने पकडलेला हायवा सोडल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यात दिवसभर ऐकायला मिळत होती.
माजलगाव तालुक्यात मागील वर्षभरात पोलीस व महसूल विभागाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करण्यात आली. या वाळू तस्करीमुळे उपविभागीय अधिकारी यांना लाच घेतानादेखील पकडण्यात आले होते. मागील आठवड्यात तालुक्यात गव्हाणथडी व आडुळ या ठिकाणांचे लिलाव होऊन ते सुरू झाले असतानादेखील शिवणगाव, कवडगावथडी, रीदोरी, वाघोरा या घाटांवरून तस्करांनी वाळूचोरीचा सपाटा सुरूच ठेवला. सोमवारी सकाळी अकरा वाजता शिवणगाव येथील बंधाऱ्याजवळच्या वाळूघाटावरून वाळूचोरी करताना एक हायवा महसूल विभागाच्या पथकाने पकडल्याची विश्वसनीय माहिती आहे.
दरम्यान, पकडलेला हायवा महसूलच्या पथकांच्या निगराणीत शिवणगाव, पायतळवाडी, सावरगाव मार्गे तहसीलमध्ये जमा करण्यासाठी निघाला होता. यावेळी सावरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ पथक आले. या ठिकाणी तहसीलदारांची गाडी आली. या ठिकाणी असलेल्या एका शेतात महसूल कर्मचारी व वाळूमाफियात चर्चा होऊन मोठ्या मलिद्याने मांडवली केल्यानंतर तहसीलदारांची गाडी परत माजलगावकडे आली. तर वाळूने भरलेला हायवा सावरगावकडे गेल्याची चर्चा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यात व सावरगाव परिसरात दिवसभर होती.
तपासणीनंतर वाहने सोडली
माजलगाव तालुक्यात सध्या वाळूचे अधिकृत दोन टेंडर सुरू झाले असून हे टेंडर कसे चालू आहे, हे पाहण्यासाठी जात असताना आम्ही रस्त्यावर भेटलेल्या गाड्या तपासल्या. वाहनांमध्ये वाळू किती आहे? त्या वाहनचालकाकडे वाळूची पावती आहे? की नाही याची खात्री करण्यात आल्यानंतर गाड्या सोडून देण्यात आल्या.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव