लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : नातेवाईकांकडून गावाकडे निघालेल्या दाम्पत्याला रस्त्यात अडवीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. चोरट्यांचा प्रतिकार करताना महिला जखमी झाली आहे. यामध्ये महिलेच्या अंगावरील सुमारे ६० हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच रात्री आणखी तिघांना लुटल्याची माहितीही समोर येत आहे. चोरट्यांची चारचाकी जीप पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
परळी तालुक्यातील मांडखेल येथील तबला वादक व मृदंगाचार्य मधुकर नागरगोजे हे दुचाकीवरून (एम.एच.४४ इ.९८३५) पत्नी शिवकन्यासोबत तडोळी येथे नातेवाईकांकडे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गेले होते. पाहुण्यांसोबत बोलून झाल्यानंतर काम आटोपून ते रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास गावाकडे निघाले होते. माळहिवरा व तडोळीच्या मध्ये पांढºया रंगाची जीप आडवी लावून मधुकर नागरगोजे यांची दुचाकी थांबविली.
जीपमधील एक जण उतरला आणि त्याने मधुकर नागरगोजे यांच्या गळ्याला चाकू लावला, तेवढ्यात पत्नी शिवकन्या यांनी महिलेने चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांच्या हातातील चाकू या महिलेने धाडसाने हिसकावून घेतला. झटापटीत महिलेच्या हाताला चाकू लागल्याने मोठी जखम झाली.
महिलेच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. दुसरा आणखी एक जण गाडीतून उतरला व त्याने शिवकन्याबाई यांच्या तोंडाचा स्कार्फ सोडला. एवढ्यात त्यांना त्यांच्या अंगावर दागिने दिसले. त्यांच्या अंगावरील दागिने त्यांनी लंपास केले. जखमी महिलेला परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करून नंतर त्यांना अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचार करून त्यांना गुरूवारी सुटी देण्यात आली. शिवकन्या नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ६० हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे म्हटले आहे.
एकाच रात्री तीन वाटमा-यायाच चोरट्यांनी या दाम्पत्याला लुटल्यानंतर पुढे गेल्यावर आणखी एका दुचाकीवरील दोघांना लुटले. येथे या दोघांना मारहाण करून चोरटे पसार झाले. त्यानंतर धारोबा देवस्थानाजवळ एका टेम्पो चालकासही मारहाण करून लुटले. भरधाव वेगाने जीप जात असताना त्यांनी पठाण मांडवा येथे एका दुचाकीला धडक दिली. तर काळवटी तांडा येथे चौघांना धडक दिली. भरधाव वेगाने वाहन जात असतानाच पळशी पाटी येथे त्यांची जीप खराब झाली. त्यांनी जीप जागेवरच सोडून पळ काढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.