बीड : विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान मिळण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच शाळांचा यात समावेश आहे. तर बीड येथील शिवाजी विद्यालयात जिल्ह्यातील पहिल्या क्लबची स्थापना करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पाच शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत आहेत. शिवाजी विद्यालयात पहिल्या क्लबची स्थापना झाली. उद्घाटन न्यायाधीश डी. एम. खडसे, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जगन्नाथराव औटे यांच्या हस्ते झाले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या बीड येथील अधीक्षक यु. बी. रुपदे, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे, पर्यवेक्षक बी. डी. मातकर, परीक्षा विभाग प्रमुख गिरीश चाळक, गणेश जोशी हे व्यासपीठावर उपस्थित होते.या क्लबमार्फत मुलांना कायदेविषयक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच निबंध, वक्तृत्व, स्पर्धा परिक्षेसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. मुलांना न्यायालयात चालणारे न्यायदान विषयक कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे न्या. खडसे म्हणाले.
शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे म्हणाले, कुठल्याही समाजामध्ये जागृती करुन परिवर्तन घडवायचे असेल तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन जागृती केल्याशिवाय गत्यंतर नाही. अक्षर साक्षरता, संगणक साक्षरता, जलसाक्षरता आता कायदेविषयक साक्षरता शालेय स्तरावरुन करणे गरजेचे आहे. हे ओळखून हा स्तुत्य उपक्रम उच्च न्यायालयाच्या आदेशाने राबविला जात असल्याचे ते म्हणाले.
मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे यांनी क्लबमार्फत सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची तसेच सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली. या वेळी अजय चव्हाण, आर. आर. भावसार, एच. आर. सावंत, जी. बी. वाघमारे, नाईकवाडे, शिंदे, परदेशी यांना कायदेविषयक पुस्तके देण्यात आली. राजकुमार कदम यांनी आभार मानले. या वेळी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.न्याय व्यवस्थेमुळेच देशाचा कारभार व्यवस्थितपूर्वी न्यायाधीश पाहायचे म्हटले तर अवघड बाब होती. परंतु आता न्याय तुमच्या दारी असे उपक्रम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला त्याच्या गावातच न्यायालयीन कामकाजाची माहिती न्यायाधीशांमार्फत मिळत आहे. न्याय व्यवस्था आहे म्हणूनच देशाचा कारभार व्यवस्थित सुरु असल्याचे अॅड. जगन्नाथ औटे या कार्यक्रमात म्हणाले.
या शाळांमध्ये होणार क्लबयोगेश्वरी कन्या हायस्कूल अंबाजोगाई, माजलगावच्या सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय, कालिकादेवी हायस्कूल, शिरुर व पं. जवाहरलाल नेहरु हायस्कूल, आष्टी येथे लीगल लिटरसी क्लब लवकरच सुरु होणार असल्याचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे म्हणाले.