संजय तिपाले बीडमिनीमंत्रालयात दिग्गज नेत्यांच्या वारसदारांनी जोरदार मुसंडी मारुन आपला दबदबा कायम ठेवला. माजी मंत्र्यांच्या सौभाग्यवतीसह सून, पुत्र व माजी आमदाराच्या पुत्रालाही निवडून देत मतदारांनी राजकीय घराणेशाहीच्या बाजूने कौल देणे पसंत केले. विद्यमान जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, विद्यमान सदस्य युद्धजित पंडित या दोघांनीही अनुक्रमे चकलांबा, उमापूर गटातून विजय नोंदवला. विजयसिंह हे माजी मंत्री शिवाजीराव पंडित तर युद्धजित हे माजीमंत्री बदामराव पंडित यांचे पुत्र असून नात्याने चुलतबंधू आहेत. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके व पुतणे जयसिंह सोळंके हे पहिल्यांदाच जि.प. मध्ये दाखल झाले. परळी तालुक्यातील धर्मापुरी जि. प. गटातून काँग्रेस- राकॉच्या विद्यमान उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी विजय संपादन केला. त्या माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या स्रुषा आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे चुलतबंंधू अजय मुंडे यांनी काँग्रेस- राकॉतर्फे विजय मिळवला. बीडमध्ये माजी खा. स्व. केशरबाई क्षीरसागर यांचे नातू व विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरी गटातून बाजी मारली. स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या स्नुषा सुरेखा क्षीरसागर यांचे सरपंचपदावरुन जि.प. सदस्यपदी राजकीय ‘प्रमोशन’ झाले. त्यांनी बहीरवाडी गटातून विजय नोंदवला. चौसाळ्याचे माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे पुत्र अशोक लोढा यांनी शिवसंग्रामकडून मुसंडी मारली. आष्टीत माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या स्रुषा शोभा दरेकर भाजपकडून निवडून आल्या.
दिग्गजांच्या वारसदारांची मिनी मंत्रालयात मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 12:22 AM