लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन करण्याचे काम नवीन पिढीच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. येथील कृषी महाविद्यालय, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते, तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. विलास पाटील हे होते. मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शरद शिनगारे, डॉ. संदीप घोणसीकर, डॉ. प्रताप नाळवंडीकर, डॉ. गोविंद मुंडे, राजाराम बर्वे यांची उपस्थिती होती. गाव शिवारात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वनस्पती आरोग्यवर्धक असून, मानवाच्या समतोल आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्यांनी रानभाज्यांच्या व्यवसायातून उत्पन्न वृद्धिंगत करावे, पोषण मूल्यांतून आरोग्य संवर्धन बळकट करावे. रानभाज्यातून आहारात खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार व औषधी गुणधर्म परिपूर्ण व मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचा वापर प्रत्येक ऋतुमध्ये करणे क्रमप्राप्त आहे, असे प्राचार्य ठोंबरे यांनी समारोपात सांगितले. यावेळी सहभागी शेतकरी व महिला यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी विद्या रूद्राक्ष व ज्ञानोबा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोहन धुप्पे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.
४५ प्रकारच्या रानभाज्या
रानभाजी महोत्सवात ४५ प्रकारच्या विविध रानभाज्या व ३० रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यात वाघाटे, रानकांदा, पानाचा ओवा, आंबाडी, अगरडा, टाकला, करटोली, घोळ, पुदीना, फांजी, कुंडलिक काकडी, कवट, हादगा, पिंपळ, उंबर, शेवगा, कुरूडू, मोह, तांदूळजा, भुई आवळा, बांबू, कपाळ फोडी, पाथरी, रानकेळी, काटेमाठ, केना, आंबुशी, भोकर, करवंद, रानवांगे, जंगली टमाटे, पाषाण शेपू, डोंगरी कोरफड आदी रानभाज्यांचा समावेश होता.
130821\4517img-20210813-wa0047.jpg
अंबाजोगाईतील रानभाजी महोत्सव.