बीड : कोराना महामारीवर उतारा म्हणून औषधोपचारांसोबतच लिंबू, संत्री, मोसंबी व इतर फळांचे सेवन केले जात असून, बाजारात मागील काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. परंतु, आवक कमी होत असल्याने दरही वाढले आहेत. जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत. सी जीवनसत्त्व, तसेच बहुजीवनसत्त्वयुक्त फळांना मागणी आहे. शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी शक्तिवर्धक फळे बाजारात उपलब्ध आहेत. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूवर्गीय फळांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, मागील काही महिन्यांच्या तुलनेत आवक घटली असून, दरही कमालीचे वाढले आहेत. कोरोना व इतर आजारांपासून संरक्षण व्हावे, शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून ही फळे महाग झाली असली तरी खरेदीचा ओघ कायम आहे.
--------
फळांमध्ये ९० टक्के पाणी भरपूर जीवनसत्त्व असतात. शरीरास हवे असणारे सर्व घटक मिळतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज, मोसंबी अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश असल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण व तापमान नियंत्रित राहते. सध्या कोरोनाच्या काळातही या फळांचा उपयोग उत्तम मानला जातो. मोसंबी, संत्री, द्राक्ष अशा सिट्रस फ्रुटमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. - डॉ. रितू गवते, फिजिओथेरेपिस्ट,बीड.
--------
लिंबूवर्गीय सर्व प्रकारची फळे जसे लिंबू, संत्रा, मोसंबी ही व्हिटॅमिन सी, कॅल्शियम व विविध रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी असल्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे, आणि हे खरे आहे. सर्व प्रकारची फळे याच प्रकारे पौष्टिक असतात व शक्तिवर्धक असतात. परंतु, कोरोना पार्श्वभूमीवर लिंबूवर्गीय फळांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. - रामेश्वर चांडक, कृषी व आहार तज्ज्ञ, बीड.
----------
सी व्हिटॅमिनयुक्त फळे इम्युनिटी वाढवितात. रसदार फळांमुळे डिहायड्रेशन टाळता येईल. प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठता टाळता येते. फळांतील पोटॅशिअम शरीरातील प्रमाणावर नियंत्रण ठेवते. फळांतील ॲन्टीऑक्सिडंटमुळे ॲनिमियासारखे आजारही टळू शकतात. फळे घरी आणून स्वच्छ धुवून खावीत, काळजी घ्यावी.- डॉ. अनिल बारकूल, माजी अध्यक्ष आयएमए, बीड.
------------
कोरोनाबाधितांसाठी फळे महत्त्वाची आहेत. सी तसेच अन्य व्हिटॅमिन फळांमधून नैसर्गिकरीत्या मिळते. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. मी दहा दिवस रुग्णालयात होतो, त्यावेळी फळांवर भर दिला. आजारपणात फळे मोठा आधार ठरली. -भगीरथ बियाणी, बीड.
-------
कोविडच्या काळात शक्तिवर्धक फळांमधून ऊर्जा मिळते, तसेच आजारांवर नियंत्रण राहते. दोन वेळा मोसमी फळांचे सेवन केले पाहिजे. शरीराला थंडावा मिळतो. कोरोना व तणावाच्या काळात फळे शरीरासाठी पौष्टिक आहेत. मी दररोज फळांचे सेवन करतो. - हसीन अख्तर, बीड.
----------------
फळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल
मोसंबी ५० ७०, ८० १००
संत्री ४० ५० ८० १००
लिंबू ५० ६० ७० ८०
----------
जालना, पाचोड, बीडमधून मोसंबी, नागपूर, गंगानगर, विदेशांतून संत्री, तर लिंबू बीडमधून
जालना, पाचोड, तसेच बीड जिल्ह्यांतून मोसंबीची आवक होते. नागपुरी संत्रीची काही महिने आवक झाली. त्यानंतर राजस्थानातील गंगानगरहून किनू व सध्या विदेशातील माल्टा जातीची संत्रींची आवक आहे. लिंबू मात्र बीड जिल्ह्यातील उत्पादकांकडून आवक होतो.