बीड : दोन वर्षापूर्वी घेतलेल्या दोन हजार रूपयांचे सावकाराने व्याजासकट २८ हजार केले. त्यानंतर या रकमेचा तगादा लावत त्या शेतकऱ्याला कपडे फाटेस्तोवर बेदम मारहाण केली. सावकाराच्या सततच्या तगाद्याला, मारहाणीला आणि मानहानीला कंटाळलेल्या त्या शेतकऱ्याने अखेर गळफास घेत स्वत:चे जीवन संपविले. रविवारी सकाळी बीड तालुक्यातील राजुरी (नवगण) येथे ही घटना उघडकीस आली.
गंगाराम विश्वनाथ गावडे (रा. राजुरी न., ता. बीड) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. आर्थिक निकडीतून त्यांनी दोन वर्षापूर्वी गावातील खाजगी सावकार लाला उर्फ युवराज पांडुरंग बहिरकडून दोन हजार रूपये दहा टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. या रकमेची परतफेड करूनही सावकाराने दोन हजारांची रक्कम दोन वर्षातच व्याजासकट २८ हजार केली. त्यासाठी गंगारामच्या मागे तगादा सुरू केला. मारहाणीच्या धमक्या मिळू लागल्याने गंगाराम तणावाखाली होते. शुक्रवारी युवराज बहिरने गंगरामच्या घरी जाऊन पुन्हा धमक्या दिल्या. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सावकाराने गंगारामला स्वत:च्या शेतात बोलावून घेतले.
गंगारामची दुचाकी (एमएच २३ एस ९८३९) ठेवून घेत त्याने गंगारामला मारहाण करून कपडे फाडले. पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसेबसे घर गाठले. त्यानंतर ते प्रचंड तणावात होते. पत्नीने समजूत घालूनही काही फरक पडला नाही. अखेर रविवारी पहाटे ३ वाजेनंतर गंगाराम यांनी घरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. असा घटनाक्रम त्यांची पत्नी आशाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सावकार युवराज बहिरविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी सावकार फरार झाला आहे.
मृत्यूपूर्व चिठ्ठीत वाचला अन्यायाचा पाढा दरम्यान, गंगाराम यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात त्यांनी पैसे परत करूनही सावकाराने अधिक रकमेची मागणी करत केलेल्या छळाबद्दल सविस्तर लिहीले आहे.