- अविनाश कदम
आष्टी : जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण प्रथम आष्टी तालुक्यात आढळून आला होता. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाची धडकी भरली होती. त्यानंतर कोरोनाची भिती सर्व सामान्य नागरिकांच्या मनातून जात नाही तोच आता तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण आहे. यात बिबट्या केवळ जनावरांची शिकार करून न थांबता आठवडाभरातच तीन मनुष्य बळी घेतले आहेत. यामुळे आता या गावागावात 'बिबट्या दिसला रे दिसला' च्या अफवा आणि चर्चांना उधाण आले असून नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
तालुक्यातील पिंपळा येथे बीड जिल्ह्यातील सर्वात पहिला कोरोना रूग्ण आढळून आला होता. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, तालुक्यातील काही गावात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. यातच बिबट्या नरभक्षक झाला असून झाला त्याने सुरुडी ,किन्ही,पारगाव या गावातील प्रत्येकी एक जणांचा बळी घेतला आहे. तर मंगरूळ व पारगाव येथील महिलांवर हल्ला करून गंभीर जखमी केले.
यानंतरही सुर्डी, पांगूळगव्हाण आणि पारगाव येथे बिबट्या पाहिल्याचे बोलले जात आहे. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जवळपास १२५ कर्मचारी कार्यरत आहेत. वनविभागाची एकूण १७ पथके तालुक्यात दाखल असून बिबट्याला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. जोगेश्वरी पारगाव शिवारात सोमवारी सकाळपासूनच पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन केले होते. औरंगाबाद, पुणे,उस्मानाबाद ,सोलापूर येथील वन विभागाचे पथके काम करीत आहेत. तसेच जुन्नर आणि चंद्रपूरच्या ताडोबाच्या जंगलातील अनुभवी पथके सोमवारी सायंकाळी आष्टीमध्ये दाखल झाले आहेत. हा नरभक्षक बिबट्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून आला असावा, अशी शंका वनविभागाने व्यक्त केली आहे.