लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचार आणि सुविधांमुळे कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत, तर बाहेर उभा राहून त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक बेहाल होत आहेत. परंतु काही नातेवाईक सुरक्षारक्षक व परिचारिकांसोबत वाद घालत आत प्रवेश करत आहेत. बाहेर आल्यावर त्यांच्याकडून कसलीही काळजी घेतली जात नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसते.
कोरोनाबाधितांना संपर्क साधण्यासाठी अणि त्यांना जेवणाचा डब्बा, इतर आवश्यक साहित्य पोहचविण्यासाठी नातेवाईक रुग्णालयाबाहेर तासन्तास उभे असतात. या नातेवाईकांची सोय व्हावी, यासाठी सुविधा केली असली तरी त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.
जनरल वॉर्डसारखी सर्वत्र अवस्था
जिल्हा रुग्णालयात नातेवाईक बिनधास्त फिरत आहेत. कोरोना वॉर्ड असतानाही त्यात जनरलसारखी अवस्था आहे. भेटू दिले नाही तर बहुतांश नातेवाईक हे कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉयसोबत वाद घालत आहेत.
कोणी जेवणाचा डब्बा देण्यासाठी येतोय तर कोणी साहित्य
रुग्णालयात कसल्याच सुविधा नाहीत, म्हणून सारखा फोन येतोय. जेवण चांगले आहे, पण चव नाही, असे सांगितल्याने घरून डब्बा आणला. पण आत जाऊच देत नाहीत. आम्हाला नाही जाऊ दिले तर यांनी येथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून सोय करावी.
- पंडितराव मदने, बीड
माझे वृद्ध नातेवाईक चार दिवसांपासून सहा क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत. त्यांना वाफ घेण्याची मशीन देण्यासाठी थांबलो आहे. बाकीचे लोक चोर मार्गाने मध्ये जातात. त्यांना काहीच केले जात नाही. आम्ही विनंती करूनही जाऊ देत नाहीत.
- माणिक काळे, बीड
भरपूर नातेवाईक आत-बाहेर करतात. ते कसलीच काळजी घेत नसल्याचे आम्हाला दिसत आहे. आम्ही पूर्ण काळजी घेऊन जाऊ, असे सांगितले तरी सोडत नाहीत. तसेच आत साहित्य व जेवण पोहचविण्यासाठी सुविधाही नाही.
- मंगेश मुंडे, बीड
===Photopath===
120421\12_2_bed_6_12042021_14.jpeg
===Caption===
कोरोनाबाधितांना भेटण्यासाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नातेवाईकांची झालेली गर्दी दिसत आहे.