बीड : कोरोनाची दुसरी लाट अद्याप गेलेली नाही. या लाटेला निरोप द्यायचा तर आहेच; परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेचीही तयारी करायची आहे. सुदैवाने ही लाट येऊच नये; परंतु जर आली तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात लढा तर द्यायचाच आहे; शिवाय ती जिंकूनही दाखवायची आहे. यासाठी जनता, अधिकारी, कर्मचारी या सर्वांची गरज असल्याचे मत नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले.
कोरोनाचे संकट भयंकर आहे. हे केवळ जनतेसाठीच नव्हे तर शासन, प्रशासन आणि यंत्रणेसाठीही आव्हान ठरलेले आहे. मागील वर्षभरापासून सर्वचजण याचा अनुभव घेत आहेत. एवढेच नव्हे तर या संकटावर मात करण्यासाठी लढाही देत आहेत. पहिल्या लाटेत अनेकांचा जीव गेला. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही मृत्युसत्र कायम राहिले. प्रशासन, शासनासह आरोग्य विभागाने हे मृत्यू रोखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. त्यात काहीसे यशही आलेले आहे. परंतु आता माझ्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आहे. मी ती स्वीकारून लगेच कामाला सुरुवात केली आहे. आदित्य महाविद्यालयातील स्थलांतरित रुग्णालय, कोरोना वॉर्डमध्ये जाऊन राऊंड घेतल्या. सुरुवातीला दिसलेल्या त्रुटी सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी आठवड्यात झालेली दिसेल. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. परंतु ही सर्व प्रशासकीय कामे आहेत. आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचे आहे. मी आणि माझी यंत्रणा तर काम करीतच आहे; परंतु यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे. रविवारी त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावरून माध्यमांपर्यंत पोहोचविल्या. .... बीडच्या माध्यमांबद्दल आदर
बीड जिल्ह्यातील माध्यमांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवून त्या निदर्शनास आणल्या आहेत. तसेच चांगल्या कामाचे कौतुक करून राज्यात नाव उंचावले आहे. त्यामुळे बीडच्या माध्यमांबद्दल मला आदर आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक बातमी माझ्यासाठी मार्गदर्शक राहील आणि त्या सकारात्मक घेऊन त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्य करू, असे डॉ. साबळे यांनी म्हटले आहे.
===Photopath===
130621\022013_2_bed_24_13062021_14.jpg
===Caption===
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड