लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या बाजूने आणि मुख्य प्रवेशद्वारावर अतिक्रमणे थाटल्याचे दिसत आहे. यामुळे एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही ही अतिक्रमणे हटविण्याबाबत आरोग्य विभागाकडून पालिकेकडे कसलीही मागणी करण्यात आलेली नाही; तर पालिकेनेही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या दोघांच्याही अभयामुळे त्यांचे मनोबल वाढत असून दिवसेंदिवस ते वाढत असल्याचे दिसते. भंडारा दुर्घटनेला डोळ्यांसमोर ठेवून याची माहिती घेतली असता हे समोर आले.
जिल्हा रुग्णालयाच्या आयपीडी आणि ओपीडी अशा दोन वेगवेगळ्या इमारती आहेत. तसेच सध्या कोरोना आयसीयूची स्वतंत्र इमारत असून ती आयपीडी विभागाला जोडली आहे. या इमारतीचे मागील बाजूचे गेट कायम बंद असते. तसेच आयपीडी विभागाचा केवळ समोरचा दरवाजा माहीत आहे. मागील दरवाजा कायम बंद असतो. विशेष म्हणजे पाठीमागे दरवाजा आहे की नाही, याची माहितीच अनेकांना नसल्याचे सांगण्यात आले.
तसेच ओपीडी विभागालाही एका मुख्य दरवाजासह दोन बाजूंनी गेट आहेत. यातील केवळ एकच गेट कधीतरी उघडले जाते. एक तर कायम बंद असते. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडली तर ती आटोक्यात आणण्यासाठी अथवा त्यावर उपाययोजना करण्यासाठी याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, यापूर्वीच मागील वर्षी प्रशासकीय इमारतीला आग लागली होती. तेव्हा मुख्य गेटवर सर्वत्र धूर होता. आपत्कालीन दरवाजा नसल्याने अग्निशमन विभागालाही आतमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. ही दुर्घटना घडल्यानंतरही आरोग्य विभागाने याबाबत कसल्याही उपाययोजना केल्या नसल्याने सामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत एकदाही झाले नाही मॉकड्रिल
जिल्हा रुग्णालयात नियमित शेकडो रुग्ण ओपीडीमध्ये येतात; तर आयपीडीमध्ये असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असते. या दृष्टीने आतापर्यंत एकदाही येथे अग्निसुरक्षेची रंगीत तालीम झाली नसल्याचे सांगण्यात आले.
आपत्कालीन मार्ग बंद
n जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण इमारतीला दोन-तीन गेट आहेत. यातील एसीबीच्या कार्यालयाकडील गेट कायम बंद असते.
n तसेच पाठीमागील बाजूचे गेट हे मागील काही दिवसांत उघडले जात आहे. अनेकांना रुग्णालयाला गेट किती याचीच माहिती नसते.