बीड : शेतातून जाणाऱ्या वाटेवरून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा तलवारीने हल्ला करून खून केला होता. यात आरोपी मुलाला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी तिसरे अति.जिल्हा व सत्र न्या. यू.टी.पोळ यांनी दिला.
काकासाहेब किसन कर्डीले असे मयत पित्याचे नाव असून संपत कर्डीले असे शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. २ जून २०१७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संपतने रस्ता करण्यासाठी शेतात जेसीबी आणली. यावरूनच संपत आणि पिता काकासाहेब यांच्यात वाद झाला. हाच राग मनात धरून रात्री ११ वाजेच्या सुमारास संपतने काकासाहेब यांच्यावर पायावर, हातावर तलवारीने वार करून खून केला.
याप्रकरणी मयताचा भाऊ दत्तात्रय कर्डीले यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आले. याची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्या. यू.टी.पोळ यांच्या न्यायालयात झाली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील अनिल भ.तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी संपतला कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवून जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली. तसेच कलम २०१ प्रमाणे दोषी ठरवून दोन वर्षे सक्त मजूरी व ५०० रूपयांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी वकील अनिल. भ. तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून सहा.फौजदार ठाकूर व पोलीस हवालदार बाळासाहेब सानप यांनी या प्रकरणात मदत केली.