बीड : खाद्यपदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी भगवान ऊर्फ बाळू अप्पासाहेब दळवे (४०, रा. जयगाव) यास जन्मठेप आणि ६० हजार रूपये दंडाची शिक्षा अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी सुनावली.
एका कुटुंबातील दहा वर्षीय मुलगी सुटीनिमित्त जयगाव (ता. परळी) येथे आली होती. तिच्या पोटात दुखत असल्याने २६ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ती आजीसोबत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात गेली होती. २०१२ च्या उन्हाळ्यापासून ते २०१६ च्या दिवाळीपूर्वी वेळोवेळी गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. डॉ. अश्विनी अमृतवार आणि डॉ. स्वाती अग्रवाल यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती.
सुरुवातीस तक्रार देण्यास पीडितेच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. परंतु पोलिसांनी पीडिता आणि तिच्या माता-पित्याला धीर देत त्यांची समजूत घातली. त्यानंतर सदर मुलीच्या फिर्यादीवरून भगवान दळवे विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास उपनिरीक्षक एम. एस. जाधव यांनी केला. नंतर हा तपास अंबाजोगाई उपविभागाचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण जिल्हा न्या. ३ तथा अपर सत्र न्या. माहेश्वरी पटवारी यांनी आरोपी भगववान दळवे यास जन्मठेप आणि २० हजार रूपये दंड, दहा वर्षे सश्रम कारावास व २० हजार रूपये दंड, तसेच धमकीप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास व २० हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला पोक्सो अंतर्गत दोषी धरण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अॅड. एल. बी. फड यांनी मांडली.