बीड : सुट्टीवर आलेल्या फौजीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला संपविले. नंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. ही घटना आष्टी तालुक्यातील हिवरा येथे २०१७ साली घडली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ४ आर.व्ही हुद्दार यांनी मंगळवारी निकाल दिला असून आरोपीला जन्मठेपेसह १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
शरद उर्फ दत्तू नामदेव लगड (३५ रा.हिवरा ता.आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. तर गितांजली मयताचे नाव आहे. शरद व गितांजली यांचा विवाह सोहळा थाटात झाला. सुरूवातीचे काही दिवस सुखाने संसार झाला. त्यांना एक आपत्यही झाले. परंतु नंतर शरदने गितांजलीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. २०१७ साली शरद सुट्टीवर गावी आला. दोघांमध्ये वाद झाला. शेतात पत्नी असतानाच त्याने २९ डिसेंबर २०१७ रोजी दगडाने तिला मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने बाजुलाच असलेल्या पºहाट्यांच्या ढिगाऱ्यावर मृतदेह टाकून त्याची विल्हेवाट लावली.
सायंकाळच्या सुमारास घरी आला. मित्राला सोबत घेऊन तो सासरी मांडवे (ता.जि.अहमदनगर येथे ) येथे रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गेला. पत्नी गितांजली व माझ्यात शेतीवरून वाद झाल्याचे कारण सांगत ती रागात निघून गेल्याचा बनाव केला. सासरे संपत निमसे यांनी दुसऱ्या दिवशी हिवरा गाठून शोध घेतला. याचवेळी त्यांना एका महिलेने दत्तूच्या शेतात अर्धवट अवस्थेत प्रेत जळाल्याचे सांगितले. पोलिसांना सोबत घेऊन पंचनामा केला असता मंगळसूत्र, चप्पल व इतर पुराव्यांवरून ते गितांजलीचेच असल्याचे समजले. त्यानंतर निमसे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात कलम ३०२, २०१ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब म.बेग व सपोनि यशवंत बारवकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा व सत्र न्या. आर.व्ही.हुद्दार यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाकडून ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, तपासअधिकारी, जप्ती पंचनाम्यातील साक्षीदार व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. साक्षी, पुराव्यांवरून शरद लगडला दोषी ठरवून जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाकडून अॅड.अनिल तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकिल अजय दि.राख यांनी मार्गदर्शन केले तर पैरवी अधिकारी म्हणून भिमराव बोंबाळे यांनी सहकार्य केले.
दिवसभर केले सोबत कामशरद व गितांजली या दोघांनी दिवसभर शेतातील काम केले. सायंकाळी घरी जाण्याच्या वेळेस दोघांमध्ये वाद झाला. बाजुलाच असलेला दगड उचलून शरदने गितांजलीला मारला. यात तो डोक्याला लागून ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. याचवेळी रागात असलेल्या शरदने आणखी एका दगडाने तिच्या डोक्यात जोरात मारले. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर तोच मृतदेह उचलून बाजुला असलेल्या पºहाट्यावर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.