अंबाजोगाई : शहरांलगतच्या पोखरी शिवारातील शेतात सोयाबीनच्या जळालेल्या ढिगाजवळ महिलेचा पूर्ण जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. अखेर या खुनाचा उलगडा करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आले. व्याजव्यवहार करणाऱ्या सदर सावकार महिलेने पैशासाठी लावलेल्या तगाद्यास कंटाळून गावातील बाप-लेकांनी तिचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी बापा-लेकास अटक केली आहे. विशेष म्हणजे बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा उलगडा करून गेले तरी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना त्याचा पत्ता नव्हता. पोखरी येथील काशीबाई विष्णुदास निकम (वय ५५) ही महिला रविवार (दि.२९) रात्रीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात दिली होती. सोमवारी दुपारी पोखरी शिवारातील पट्टी नावाचे शेतात सोयाबीनच्या जळालेल्या ढिगाजवळ एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेला अवस्थेत सापडला होता. मृतदेहाच्या पायातील लोखंडी रॉडवरुन तो मृतदेह काशीबाई यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन झाल्यानंतर काशीबाई यांच्या खून प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने खुनाचा तपास करणे क्लिष्ट झाले होते. मात्र, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अंबाजोगाई येथे दाखल होत तपास सुरु केला. सावकारकी बेतली जीवावर :काशीबाई निकम यांची गावात सावकारकी होती अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. एलसीबीने त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरु केला असता पोखरी येथील भाऊसाहेब हरीदास थोरात याच्यासोबत काशीबाईचा आर्थिक व्यवहार असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून भाऊसाहेबला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरु केली. अखेर भाऊसाहेबने घडाघडा माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. भाऊसाहेबने काशीबाईकडून व्याजाने पैसे घेतले होते. ती रक्कम व व्याजासाठी काशीबाईने त्याच्याकडे सतत तगादा लावला होता. तिच्या धमक्यांना वैतागून धमक्यामुळे भाऊसाहेबव त्याचा मुलगा विशाल याने रविवारी रात्री साडेदहा वा.चे सुमारास काशीबाईला त्यांच्या किराणा दुकानाचे वरच्या मजल्यावरील खोलीत पैसे देण्याच्या बहाण्याचे बोलावून घेतले. काशीबाई तिथे आली असता त्यांनी लोखंडी ठोंब्याने तिच्या डोक्यात मारुन तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तिचा मृतदेह पोत्यात घातला. दुचाकीवरून मृतदेह पोखरी शिवारातील पटी नावाचे शेतातील सोयाबीनचे ढिगाजवळ नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिले अशी कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी बाप-लेकास अटक केली असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांचा ढिसाळ कारभार :सदरील खून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडला होता. एका दिवस उलटूनही त्यांना काहीच शोध लागला नव्हता. त्यानंतर बीडचे एलसीबीचे पथक अंबाजोगाईत दाखल झाले. पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, एलसीबीचे निरिक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवघ्या काही तासात तपासाची दिशा निश्चित केली केली आणि खुनाचा छडा लावला आणि प्रसिद्धीपत्रक देखील काढले. मात्र, बुधवारी (दि.०२) दुपारपर्यंत अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना याचा पत्ताच नव्हता असे दिसून आले. अद्याप संशयित आरोपीने काहीच माहिती दिली नाही, आमचा तपास सुरु आहे, तपासात कळेल असे आश्चर्यजनक उत्तरे ग्रामीण पोलीस देत होते. हद्दीत अवैध धंदे बोकाळले असल्याने आणि विविध भागात दारूभट्ट्या जोमाने सुरु असल्याने आधीच नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका आहे. त्यातच उलगडा झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाबाबतही पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सावकारकी बेतली महिलेच्या जीवावर; जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 7:36 PM
अखेर पोखरी शिवारातील खुनाचा उलगडा
ठळक मुद्दे पैशासाठी तगादा लावणाऱ्या सावकार महिलेचा बाप-लेकाने केला खून‘एलसीबी’ने खुनाचा छडा लावला तरी अंबाजोगाईचे पोलीस तपासातच!