बीड : पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस काही पैशांनी वाढ होत असली तरी त्याचा भडका मात्र चांगलेच चटके देत आहे. १६ मे रोजी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. त्यामुळे वैशाखवणव्यात पेट्रोल दरवाढीची होरपळ नागरिकांना त्रसदायक ठरत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशातील नागरिक त्रस्त आहेत; तर दुसरीकडे दिवसेंदिवस महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासूनच्या इंधन दरवाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत; तर दुसरीकडे पेट्रोलचे दर कमालीचे वाढले आहेत. मागील ३० वर्षांत बीड जिल्ह्यात ८५ रुपये ७० पैशांनी म्हणजेच ८६ रुपयांनी पेट्रोलच्या दरात लिटरमागे वाढ झालेली आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळून अनेकजण स्वतःचे वाहन खरेदी करून प्रवास करण्याकडे कल वाढला आहे. त्याचबरोबर दुचाकीवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही मागील चार वर्षांत वाढलेली आहे. सर्वसामान्यांना शहरातील वाहतुकीसाठी, व्यवसायासाठी पेट्रोलच्या वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे दररोज मागणी वाढतच आहे. १९९१ मध्ये जिल्ह्यात पेट्रोलचे दर १५ रुपये लिटर होते. या दरात वाढ होत मागील ३० वर्षांत लिटरमागे ८५ ते ८६ रुपयांची वाढ झाली आहे. आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल शंभरी गाठल्यामुळे हे भाव कधी कमी होतील, याची चिंता करण्यापलीकडे जनतेपुढे पर्याय नसल्याचे दिसते.
------
कच्च्या तेलाची किंमत कमी असूनही दर ठरविण्याचे अधिकार केंद्राला असतानाही केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या नफेखोरीसाठी दर वाढविले जातात. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतानमधील तेलाचे दर भारतापेक्षा ३० टक्क्यांनी स्वस्त आहेत. कुठल्याही कारणाशिवाय तसेच कोरोनाकाळात विरोधक रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू शकत नाहीत, याचा सत्ताधारी गैरफायदा घेत आहेत.
- ॲड. भीमराव चव्हाण, बीड
----------
आपण ९० च्या दशकाच्या सुरुवातीलाच मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. त्याचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. पेट्रोलियम पदार्थांचे भाव बाजाराच्या अधीन आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी झाल्यावर जर आपण तक्रार करीत नाही, आनंदी होतो. मग थोडेसे आणि थोड्या कालावधीसाठी दरवाढ झाली तर तक्रार कसली? विनाकारण फिरण्यात होणारा पेट्रोलचा अपव्यय टाळून सायकल व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल.
- महेश बुद्धदेव, व्यापारी, बीड
--------
मी १३ वर्षांपासून वृत्तपत्र व्यवसायात आहे. सुरुवातीला सायकलवर वृत्तपत्रे वाटप करीत होतो. नंतर ग्राहक वाढल्याने काम तत्परतेने होण्यासाठी पेट्राेलवरील दुचाकी खरेदी केली. त्याचा आधार झाला. मात्र आता पेट्रोलने शंभरी गाठल्याने खर्च वाढत आहे. त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. पुन्हा सायकलचा वापर करावा लागेल, असे वाटते.
- गणेश घोलप, बीड.
-------
पेट्रोल दर प्रतिलिटर
१९९१ - १५.३०
२००१- २९.४०
२०११- ६८.३३
२०२१ - १००
---------
तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त
इंधनावर लावण्यात येणाऱ्या ६४ टक्के कराची विभागणी ही केंद्र आणि राज्य सरकारची स्वतंत्र असते. राज्य सरकारचा व्हॅट २४ टक्के, तर केंद्र सरकारकडून ४० टक्के कर आकारला जातो. ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या पेट्रोलच्या किमतीमध्ये ६४ टक्के कर असतो. तसेच कच्च्या तेलाची किंमत, प्रक्रिया आणि पेट्रोल वितरकांचा वाटा या बाबी लक्षात घेतल्या तरीही तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त आहे.
---------