बीड : अंगावर चट्टे, जखमा, अंग बधिर अशा लक्षणांमुळे वैतागलेल्या एका वृद्धाने आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आरोग्य विभागाने त्याच्यावर सलग १६ महिने उपचार करून त्याला सामान्य माणसाप्रमाणे बनविले आहे. चार दिवसांपूर्वीच या वृद्धाचा अहवाल सकारात्मक आला आहे. कुष्ठराेग कार्यालयाच्या या यशाने सामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
गेवराई तालुक्यातील एका गावातील ६० वर्षीय वृद्ध नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्हा रुग्णालयात आला. येथे त्याची तपासणी केली असता त्याला कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर या वृद्धाला तात्काळ तपासणी करून कार्यालयाकडून औषधोपचार सुरू केले. जवळच्या आरोग्य केेंद्रात प्रत्येक महिन्याला बोलावून घेत औषधी देण्यात आली, तसेच वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञ या पथकाकडून प्रत्येक तीन महिन्यांनी भेट देऊन पाहणी करण्यात आली, तसेच शेजारच्यांना काही त्रास आहे का, याचे सर्वेक्षण करण्यात आले.
दरम्यान, अंगावरील जखमा आणि चट्टे, तसेच सुजलेला चेहरा याला वैतागून संबंधित वृद्धाच्या मनात आत्महत्येसारखे विचार आले होते. शेवटचा पर्याय म्हणून ते शासकीय रुग्णालयात आले होते. येथे त्यांना दर्जेदार उपचार मिळाल्याने ते आज सामान्य नागरिकांप्रमाणे दिसत आहेत. शिवाय त्रासही काहीच नाही. चार दिवसांपूर्वीच त्यांची कुष्ठरोग कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे सर्व अहवाल समाधानकारक आले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अति. डॉ. एल.आर. तांदळे, डॉ. संजय कदम, डॉ. नरेश कासट यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पवार, तत्कालीन अधिकारी डॉ. सतीश शिंदे, डॉ. मुकेश कुचेरिया आदींनी या पाठपुरावा करून वृद्धाला त्याला ठणठणीत केले आहे.
कोट
आलेल्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार दिले जातात, तसेच त्यांचा पथकांमार्फत पाठपुरावा केला जातो. सामान्य नागरिकांनी शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून उपचारासाठी पुढे यावे. हे केवळ एक उदाहरण आहे. जिल्ह्यात असे शेकडो लोक कुष्ठरोगातून दुरुस्त झालेले आहेत.
-डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड