लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली.बुवासाहेब रामभाऊ बन यांचे जावाई शिवाजी गिरी यांनी गणेश पुरी याच्याकडून ५७ हजार रुपयात एक गाय विकत घेतली होती. त्यापैकी ५५ हजार रुपये दिले होते व २ हजार रुपये देणे बाकी होते. ८ मे २०१८ रोजी गणेश पुरी हा वस्तीवर गेला. तेथे शिवाजी यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच शिवाजीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर ९ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा शिवाजीच्या वस्तीवर आला. तेंव्हा गायीची उर्वरित बाकी २ हजार रुपये शिवाजी याने सालगड्यादेखत दिली होती. तर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेश पुरी हा पत्नीसोबत वस्तीवर जाताना शिवाजीच्या पत्नीने पाहिले होते. तिला संशय आल्याने ती त्यांच्या पाठिमागे गेली. त्याचवेळी गणेश पुरी याने शिवाजीवर हत्याराने वार केल्याचे तिने पाहिले. यावेळी गणेशला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ढकलून तो दुचाकीवरुन निघून गेला. तर गणेशच्या पत्नीने तेथून पळ काढला. या प्रकरणी बुवासाहेब बन यांच्या फिर्यादीवरुन गणेश पुरी व त्याची पत्नी सुलभा पुरी यांच्याविरुद्ध संगनमताने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अंभोरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. ए. सय्यद यांनी तपास करुन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना फिर्यादीतर्फे अॅड. प्रवीण राख, पैरवी अधिकारी पोहेकॉ. शिवाजी डोंगरे यांनी मदत केली.
दोन हजार रुपयांच्या वादातून खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:32 AM