लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीची लिफ्ट सातत्याने बंद पडत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्णांना स्ट्रेचवरून ढकलत न्यावे लागते. हा प्रकार रुग्णालयात नित्याचाच झाल्याने रुग्णालयातील गैरसोयी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत.अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे सामान्य व गोरगरीब रुग्णांचे आधारस्थान मानले जाते. येथे रुग्ण तपासणीसाठी किमान दीड ते दोन हजार बाह्य रुग्ण तर ५०० ते ७०० आंतररुग्ण उपचारासाठी असतात. शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन रुग्णालय प्रशासनाला सुसज्ज अशी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. सर्व इमारती व सुविधा अद्ययावत करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयातील गैरसोयी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. येथील अतिदक्षता विभागाच्या इमारतीत रुग्णांना चढउतार होऊ नये. त्यांची गैरसोय टाळली जावी यासाठी दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. या लिफ्ट सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे बंदच असतात. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांस झोळी करून अथवा स्ट्रेचरवरून पायऱ्या चढत न्यावे लागते. हा प्रकार रुग्णालयात नित्याचाच झाला आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला विविध तपासण्यासाठी इतरत्र घेऊन जातांना रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ढकलायला लावतात.हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. रुग्णांचे नातेवाईकही हा प्रकार निमूटपणे सहन करतात. काही बोलावे तर आपला रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याने त्याच्यावर काही परिणाम होऊ नये यासाठी ते गप्प राहतात. याचा गैरफायदा चतुर्थ श्रेणी कर्मचारी उठवत आहेत. या लिफ्टची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी रुग्ण, नातेवाईकांमधून केली जात आहे.
लिफ्ट बंदमुळे रुग्णांचे बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:19 AM