ऊसतोड मजूर विलगीकरणात
शिरूर कासार : सहा महिन्यांनासून घर सोडून ऊसतोडीसाठी गेलेले मजूर आता परतले असून त्यांनी कोरोना मुळे स्वत:च अलगीकरण स्वीकारले असल्याचे सांगत असून आठ दिवस आम्ही कुठेही मिसळणार नसल्याचे बोलतात.
उन्हाळी भगर चोळणी सुरू
शिरूर कासार : उन्हाळ्यात बाजरी, भुईमूग, मूग, आदींप्रमाणेच भगरीचासुद्धा पेरा केला होता. आता ही भगर काढून चोळून घरी नेण्याची लगबग सुरू आहे. सध्या पावसाळी वातावरण तयार होत असल्याने सुरक्षित भगर घरी नेण्यासाठी शेतकरी गडबड करीत असल्याचे दिसून येते.
गावाबरोबर खेडे गजबजले
शिरूर कासार : तालुक्यातून जवळपास पंचवीस-तीस हजार मजूर ऊस तोडण्यासाठी स्थलांतरित झाले होते. परिणामी गाव आणि खेडे ओस पडले होते. मजुरांची वानवा जाणवत होती. आता मजूर परतल्याने गावाबरोबर खेडीपाडीही माणसांनी गजबजल्याचे दिसून येत आहे.
लसीकरणासाठी गर्दी आवाक्याबाहेर
शिरूर कासार : तालुक्यात पंधरा दिवसांच्या खंडानंतर लस उपलब्ध होताच मला लस मिळाली पाहिजे यासाठी सकाळी सातपासूनच आरोग्य केंद्रावर गर्दी होती; तर लस देण्याचे काम सुरू होताच गर्दी आवाक्याबाहेर जात असल्याने पोलिसांची मदत घ्यावी लागली. गर्दीमुळे सुरक्षित अंतराचा सर्वांनाच विसर पडत असल्याचेही चित्र दिसत होते.