लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेती, समाजकार्य अशा विविध ग्रामीण भागाशी निगडित विषयांवर कथा मांडून कथाकारांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा एक सरस कथा सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
संमेलनाच्या दुस-या दिवशी सायंकाळच्या सत्रात कान्होपात्रा विचार मंचावर कथाकथन झाले. अध्यक्षस्थानी कमल नलावडे (उस्मानाबाद) या होत्या, तर पुष्पा दाभाडे (कन्नड), सत्यशीला तौर (जालना), स्वाती कानेगावकर (नांदेड), सरोज देशपांडे (परभणी), संगीता होळकर (कडा), शेख नज्मा मैनुद्दीन (धानोरा), अनिता येलमाटे (उदगीर), विजया इंगोले (अंबाजोगाई) यांनी कथाकथनात सहभाग नोंदवला.
सत्यशीला तौर यांनी ‘दिसं’ ही ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली कथा सादर केली. यामध्ये त्यांनी शिवाजी नामक व्यक्तीवर आधारित त्याचा जीवनपट मांडला. आजचा आणि उद्याचा दिवस कसा उजाडतो यावर त्यांनी मांडणी केली. स्वाती कानेगावकर यांनी ‘अपराध कोणता होता’ ही कथा सादर केली. यामध्ये निखिल व नेहा या बहीण-भावाची कथा सांगितली. निखिल हा पोलीस अधिकारी होतो, तर नेहाला डॉक्टर व्हायचे असते. नेहाने चांगला अभ्यास करुन परीक्षेला गेली. एकटी असल्याचा फायदा घेत एका रोमिओने तिला भर रस्त्यात जाळले. यामध्ये प्रामाणिक अभ्यास करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या नेहाचा नाहक जीव गेला. यात नेमका अपराध कोणाचा होता ? असे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सरोज देशपांडे यांनी ‘पापड उद्योग’ ही विनोद कथा सादर केली. तीन मैत्रिणींनी मिळून त्रिवेणी पापड उद्योग उभारला. परंतु प्रचार व प्रसाराअभावी त्याला कोणीही विकत घेत नव्हते. अखेर कंटाळून त्यांनी घरी येणाºया पाहुण्यांना चहाऐवजी पापड देणे पसंद केले. तसेच आहेराऐवजी त्यांना पापडच देण्यात आले. विनोदी आणि मुद्देसूद मांडलेली कविता लोकांच्या मनाला भिडली. देशपांडे यांनी सभागृहाला मनमुराद हसवले.
संगीता होळकर यांनी ‘आधार’ ही कथा सादर केली. इतर मान्यवरांनी विविध कथा सादर करुन प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते.