बीड/गेवराई : शेतात खुरपणी करत असताना अचानक वादळ वारे आले. सोबतच विजांचा कडकडाट झाला. यामध्ये एक वीज अंगावर कोसळल्याने चार महिला भाजल्या. त्यातील तीन महिलांचा जिल्हा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला तर भाजलेल्या एका महिलेवर उपचार सुरू आहेत. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे बुधवारी सायंकाळी घडली.
शालनबाई शेषेराव नजन (वय ६५), लंका हरिभाऊ नजन (वय ४५) आणि विजया राधाकिसन खेडकर (वय ४६ सर्व रा.चकलांबा ता.गेवराई) अशी मयत महिलांची नावे आहेत. तर यमुना माणिक खेडकर (वय ७५) या भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व महिला हरिभाऊ नजन यांच्या शेतात बुधवारी खुरपणी करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. विजेचा कडकडाटही झाला. यावेळी शेतात असलेल्या या चार महिलांच्या अंगावर वीज कोसळली. हा प्रकार परिसरातील लोकांनी पाहिला. त्यांनी तातडीने या महिलांकडे धाव घेत या सर्वांना जिल्हा रूग्णालयात हलविले. परंतू बीडमध्ये येईपर्यंतच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर भाजलेल्या यमुना खेडकर यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.नातेवाईकांचा आक्रोशघटनेची माहिती मिळताच मयतांच्या कुटूंबियांसह नातेवाईक, चकलांबा ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. एकाचवेळी तीन महिलांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. यावेळी जिल्हा रूग्णालय परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती.