इनव्हीस्टीगेशन स्टोरी
सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील मानसोपचार तज्ज्ञाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटी देण्याच्या नावाखाली वापरलेल्या वाहनाचे तब्बल १४ लाख रुपये बिल काढले. प्रत्यक्षात ज्या वाहन क्रमांकावर हे बिल काढले, ते वाहन एका खासगी व्यक्तीचे असून त्याला याबाबत कसलीच कल्पना नाही. डॉक्टर जरी वेड्यांवर उपचार करणारे असले तरी त्यांनी शहाण्यांना लाजवेल असा घोटाळा केला आहे. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने शुक्रवारी चव्हाट्यावर आणला आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. पैकी केवळ ५३ कुटुंबांनाच प्रकल्प प्रेरणा विभागाने भेटी दिल्या, तसेच इतर गावांत मार्गदर्शन व शिबिरे ८८ ठिकाणी घेतले. या एवढ्या ठिकाणी जाण्यासाठीच या विभागाने वापरलेल्या वाहनाचे तब्बल १३ लाख ६३ हजार रुपये बिल काढले आहे. हे संशयास्पद वाटल्याने 'लोकमत'ने खोलवर जाऊन माहिती घेतली असता ज्या वाहन क्रमांकावर हे बिल काढले, ते वाहनच आरोग्य विभागाला संलग्न नाही, तसेच भेटींसाठी जीप वापरली असून बिल काढलेल्या क्रमांकाचे वाहन हे छोटी कार आहे. या कारच्या मालकाला याची कसलीच माहिती नाही. प्रकल्प प्रेरणा विभागाचे प्रमुख डॉ. सुदाम मोगले यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने हे सर्व बिले काढले आहे. जे वाहन वापरलेच नाही, त्यांचे बिल काढलेच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. या घोटाळ्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जिल्हा समन्वयक, लेखापाल, कंत्राटदार, प्रकल्प प्रेरणाचे प्रमुख, लेखापाल यांचा मोठा हात असल्याचे सांगण्यात आले. या बिलावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही स्वाक्षऱ्या असल्याने त्यांच्याकडेही संशयाचे दोर पोहोचत आहे.
--
एमएच २३ एडी ६३०० या क्रमांकावर काढले बिल
प्रकल्प प्रेरणाचे डॉ. मोगले यांनी एमएच २३ एडी ६३०० या क्रमांकाच्या वाहनावर बिल काढले आहे. प्रत्यक्षात हे वाहन बीड शहरातील महेश जाधव यांच्या मालकीचे आहे. त्यांना आपल्या वाहन क्रमांकाचा वापर करून लाखोंची बिले काढल्याची कसलीच कल्पना नव्हती. 'लोकमत'ने खात्रीसाठी संपर्क केल्यावर त्यांनाही धक्का बसला. वास्तविक पाहता जे वाहन वापरले ते भंगार असून १४ वर्षांपूर्वीची जीप आहे. शासन नियमानुसार ५ वर्षांपेक्षा जुने वाहन वापरता येत नाही. हे जुने वाहन एनएचएममधीलच एका कर्मचाऱ्याचे असल्याचे समजते.
---
एमएच २३ एडी ६३०० ही कार माझ्या मालकीची आहे. हे वाहन आम्ही घरीच वापरतो. आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही. माझ्या कारच्या क्रमांकाचा असा गैरप्रकार झाल्याचे समजल्यानंतर मलाच धक्का बसला आहे. आरोग्य विभागाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे.
महेश जाधव, वाहन मालक.
--
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देण्यासह कार्यक्रमांसाठी वाहन वापरले आहे. खालच्या कर्मचाऱ्यांनी पाठविलेल्या फाईलवर मी स्वाक्षरी केली. हे सर्व नजरचुकीने झाले असून आपला काहीतरी गैरसमज झाला आहे.
डॉ. सुदाम मोगले, प्रमुख प्रकल्प प्रेरणा विभाग, बीड.
--
अगोदरच्या प्रकरणातच चौकशी सुरू करणार आहे. त्यात आता असे घडले असेल तर गंभीर आहे. सर्व माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक बीड.
110921\11bed_14_11092021_14.jpeg~110921\11bed_13_11092021_14.jpeg~110921\11bed_12_11092021_14.jpeg
ज्या वाहन क्रमांकावर बील काढले तीच ही कार आहे. याचे मालक महेश जाधव असून ते याबाबत अनभिज्ञ आहेत.~ज्या गाडीतील मोगले व त्यांचे कर्मचारी भेटी देण्याच्या नावाखाली फिरले, तेच हे वाहन आहे. याचे वय १४ वर्ष २ महिने आहे.~मार्च महिन्यात २० हजार रूपयांचे एमएच २३ एडी ६३०० या वाहन क्रमांकावर २० हजार रूपयांचे काढलेले बील. हे केवळ उदाहरण असून असे अनेक बीले आहेत.