बीड : अक्षय तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात बाल विवाह आयोजित केल्याचे प्रकार यापूर्वी देशात ठिकठिकाणी समोर आले आहेत. आगामी २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया सणाला बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार बीड जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ नयेत यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, बालविवाहाचे आयोजन करणारे वधू व वर यांचे आई-वडील, नातेवाईक, भटजी, मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, या आशयाची दवंडी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मंगळवारी दिले.
बाल विवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात, याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होऊ नये यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर माहिती द्यासरपंच, पोलिस पाटील व ग्रामसेवक यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपापल्या गावी उपस्थित राहावे. बाल विवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत चाइल्ड लाइन क्रमांक १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच संबंधित पोलिस स्टेशनलाही माहिती देण्यात यावी. अक्षय तृतीया या दिवशी बीड जिल्ह्यात बाल विवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुधीर ढाकणे यांनी केले आहे.