लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ महाराष्ट्र मिशन २०१९ अंतर्गत बीड शहराची दिल्लीच्या क्यूसीआय (क्वालिटी कंट्रोल इनस्पेक्शन) समितीकडून तपासणी केली जात आहे. दोन दिवसांपासून बीड शहराची सर्व ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ दिल्लीला केली जात आहे. या समितीकडून कागदपत्रांसह सर्व सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची तपासणी झाली. शहर हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय यशस्वी करण्यासाठी बीड पालिका गत चार महिन्यांपासून परिश्रम घेत आहे.बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी बीड पालिकेने कंबर कसलेली आहे. मागील चार महिन्यांपासून शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांना सुविधायुक्त करण्यासह वैयक्तिक शौचालयांचा लाभ दिला जात आहे. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी समितीच्या निर्देशानुसार सर्व नियम पाळले जात आहेत. मागील दोन दिवसांपासून समिती बीड मुक्कामी आहे. सकाळी उठल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत सर्व शहराची तपासणी करून व्हिडीओद्वारे दिल्लीतील अधिकाऱ्यांना लाईव्ह माहिती दिली जात आहे. तसेच शौचालयांचे रेकॉर्ड अद्ययावत आहे का? याची तपासणीही समितीच्या सदस्याकडून करण्यात आलेली आहे.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्र.मुख्याधिकारी मिलींद सावंत, अभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख युवराज कदम, निरीक्षक भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, महादेव गायकवाड, भारत चांदणे, ज्योती ढाका, प्रशांत जगताप, तत्कालीन स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके आदींनी यासाठी परीश्रम घेतलेले आहेत.दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या सुचनेनूसार समिती सदस्यांनी अनेक ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांशीही लाईव्ह संवाद साधला.सर्व तपासणी करून सायंकाळच्या सुमारास ही समिती परत गेली. आता याचा निकाल कधी लागतो आणि यात बीड पालिकेला किती यश येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड शहराची दिल्लीमध्ये ‘लाईव्ह रिपोर्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:32 AM