शिरूर कासार : तीव्र दुष्काळाचा परिणाम मुक्या जनावरांवर हो नये यासाठी तालुक्यातून आलेल्या जवळपास ४० प्रस्तावांपैकी ८ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ७ छावण्यांमध्ये ३२६२ जनावरे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून उपासमार सहन केलेले पशूधन अखेर छावणीच्या आश्रयाला दाखल झाले. एक छावणी एक - दोन दिवसात सुरू होईल, तर आणखी काही छावण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर सुरु होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आलीे.तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांना पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान होते. छावण्या सुरु करा अशी मागणी जोर धरीत होती. मात्र, चारा दावणीवर की छावणीवर हा निर्णय होण्यास विलंब होत गेला. परिणामी शेतकऱ्यांना तालुक्याबाहेरहून चारा विकत आणावा लागला. भाव गगनाला भिडले असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आणि जनावरांना अर्धपोटी रहावे लागले होते.तालुक्यात कुठेच पाणी नसल्याने पाणी पाजायचे कुठे हा आणखी जटील प्रश्न निर्माण झाला. दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता कुठे छावण्याचे दरवाजे उघडले जाऊ लागले असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वी छावण्यावरचा कडू - गोड अनुभव घेतला तरी आता त्यांच्या अन्य पर्यायच नसल्याने दावणीवरच्या खुंट्या रिकाम्या करत जवळच्या छावणीला पसंती देत शेतकरी मुक्कामी गेला आहे.आता ऊसतोड मजूर आपल्या जनावरासह गावी परतू लागले आहेत. सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे मुक्या जनावरांना जगविण्यासाठी त्यांना घरच्या दावणीऐवजी छावणीवरच आश्रय घेणे क्रमप्राप्त आहे. उन्हाचा वाढता जोर पशुधनासाठी त्रासदायक ठरणार आहे. तकलादू सावली हाच एकमेव आधार आहे तर पिण्याचे पाणी भरपूर मिळणे गरजेचे आहे. नियमाप्रमाणे चारा पाणी वेळेवर मिळाले पाहिजे इतकी माफक अपेक्षा केली जात आहे.दुष्काळाची दाहकता ओळखून शासन नियमाचे काटेकोर पालन करण्याचे बंधन छावणी चालकांचे आहे. त्यासाठी वेळोवेळी तपासणी सुरु राहील. चारा पाणी याबाबत शेतकºयांना वेठीस धरले जाणार नाही आणि तसे निदर्शनास आल्यास छावणी चालकांना कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे तहसीलदार प्रिया सुळे यांनी सांगितले. पशुधनाची संख्याची सत्यता पडताळली जाईल. कुठेही हेराफेरी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दावणीचे पशुधन छावणीच्या आश्रयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:25 AM
तीव्र दुष्काळाचा परिणाम मुक्या जनावरांवर हो नये यासाठी तालुक्यातून आलेल्या जवळपास ४० प्रस्तावांपैकी ८ छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.
ठळक मुद्देदुष्काळाची तीव्र पडछाया : ४० दाखल प्रस्तावांपैकी ७ छावण्यांमध्ये ३२६२ जनावरे दाखल; छावण्यांची संख्या वाढणार