बीड : धारूर तालुक्यातील सोनीमोहा सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना तसेच प्रशासक नियुक्त असताना संचालक मंडळाने नियमबाह्यपणे कर्ज वितरण केल्याप्रकरणी सहकार विभागाचे सहायक निबंधकांच्या फिर्यादीवरून सोसायटीचे १२ संचालक व जिल्हा बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात शासन व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सोनीमोहा सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक नेमूनही संचालक मंडळाने नियमबाह्यपणे २० सभासदांना सात लाख ६२ हजार २०० रुपये पीककर्जाचे नियमबाह्यपणे वितरण केले. या संचालक मंडळाविरुद्ध शासनाची व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक शिवाजीराव दिलीप नेहरकर यांच्या तक्रारीवरून १२ संचालक व तीन बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संचालक भगवान राघोबा तोंडे, मोहन शिवाजी तोंडे, महादेव तुकाराम तोंडे, बाळासाहेब पंढरी तोंडे, सुधाकर भानुदास तोंडे, भाऊ माधवराव गोरे, सविता रामधन तोंडे, परमेश्वर सखाराम राऊत, बाळासाहेब सखाराम नेहरकर, बापूराव रामभाऊ तोंडे, मच्छिंद्र भाऊराव तोंडे, दादासाहेब सुदाम तोंडे सर्व रा. सोनीमोहा व बँकेचे तपासणीस अशोक महादेव कदम, शाखाधिकारी प्रेमानंद तोटेवाड (रा. केज) व लिपिक सत्यप्रेम नाटकर (धारूर) या १५ जणांचा आरोपींमध्ये सहभाग आहे. सर्व आरोपी फरार असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे हे करत आहेत.