- अविनाश कदम
आष्टी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिर्णयाचा विरोध करत आ. सुरेध धस व्यापाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात दुकाने सुरू ठेवली. १० दिवसांचा लाॅकडाऊन मान्य नसून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खायची तयारी असल्याची आक्रमक भूमिका आ. धस यांनी घेतली. यामुळे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत तातडीने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात झालेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील लॉकडाऊन २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल असे जाहीर केले.
बीड जिल्ह्यामध्ये मागिल काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. याच्या विरोधात तालुक्यातील व्यापा-यांनी आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार राजाभाऊ कदम यांना गुरुवारी ( दि.२५ ) निवेदन दिले होते. यावेळी आ.धस यांनी जिथे रुग्ण आहेत तिथे कडक निर्बंध लावा. परंतु, संपूर्ण तालुका लाॅकडाऊन करु नका. यामुळे सर्वसामान्य भरडला जाईल अशी भूमिका घेतली. आज सकाळी विरोध करत आ. सुरेध धस व्यापाऱ्यांसह आज रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन काळात दुकाने सुरू ठेवली. दरम्यान, दुपारी १२ वाजता या विषयी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यानंतर झालेल्या निर्णयानुसार तालुक्यातील लॉकडाऊन दि.२९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येईल. पुढील आदेश येईपर्यंत नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र आ. धस यांना देण्यात आले. या बैठकीत उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसिलदार राजाभाऊ कदम, डिवायएसपी विजय लगारे, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, मुख्यकार्यकारी अधिकारी निता अंधारे उपस्थित होते. त्यानंतर आष्टी शहर पूर्णपणे बंद करण्यात आले. पोलिस प्रशासनाने शहरात पथसंचलन करून नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
पोलिसांच्या लाठ्या खाण्याची तयारी आष्टी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांचे दुकाने ९ ते १ या वेळेत सर्व सुरु ठेवण्याची परवानगी द्या. अन्यथा उद्यापासून सर्वच दुकाने तीन दिवसांसाठी बंद करा. पोलीसांच्या लाठ्या खाण्याची आमची तयारी आहे. १० दिवसांचा लाॅकडाऊन आम्हाला मान्य नाही.- आ. सुरेश धस