बीड : आगामी खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामाला लागले असून, बाजारातून खरेदीसाठी पैशांची तजवीज करीत आहेत. रबी आणि उन्हाळी हंगामातील माल बाजारात विकून पैशांची जमवाजमव सुरू असली तरी लॉकडाऊनमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या महिन्यात आवक घटली आहे.
मार्चपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत कोरोनाचे नियम पाळून लिलाव आणि व्यवहार करायचे असल्याने अनेकदा लिलाव दुसऱ्या दिवशी ढकलावे लागले, तर शेतकरी आपला माल आणूनही लिलाव न झाल्याने अडत्यांकडे माल टाकून गावी जाणे पसंत केले.
येथील मोंढ्यात ज्वारीची दररोज सरासरी २०० ते ३०० क्विंटल आवक होत आहे. ज्यूट ज्वारीला ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर अवकाळीचा फटका बसल्याने तीन प्रतींमध्ये विभागणी होऊन भाव १५०० ते ३५०० रुपये क्विंटल भाव मिळाला.
मार्चपासून बाजारात गव्हाची आवक वाढली. जुना गहू १५०० ते १५५० रुपये क्विंटल, तर नवा गहू २००० ते २३०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला. हार्वेस्टरने काढलेल्या गव्हाला क्विंटलमागे १६५० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दोन महिन्यांत तीन हजार क्विंटल गव्हाची आवक झाली.
उन्हाळी बाजरीची आवक चांगली आहे. मागील मोसमातील बाजरीला १३५० ते १४५० रुपये क्विंटल भाव मिळाला. कॅटलफीड बाजरीला ११०० ते १२०० रुपये भाव मिळाला. दोन महिन्यांत जवळपास चार हजार क्विंटल बाजरीची आवक झाली.
येथील बाजार समितीमध्ये मागील महिन्यात सोयाबीनची चांगली, तर या महिन्यात नगण्य आवक राहिली. भाव एकतर्फी वाढत असताना स्टॉकिस्ट व मोठ्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात माल होता. ५ हजारांचा भाव मिळाल्याने ते विकले. मात्र, नंतर हे भाव ७ हजार १०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले.
मार्चपासून बाजारात चन्याची आवक वाढली. सुरुवातीला आर्द्रतेमुळे ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव मिळाला. नंतर एप्रिलमध्ये भाव ५ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. गावरान चन्याचे भाव मात्र ४४०० ते ४६०० रुपये क्विंटलच्या घरात राहिले. प्रथिने जास्त असलेल्या चन्याला क्विंटलमागे ४९७० रुपये भाव मिळाला.
काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरीच्या पिकांना फटका बसला. तरीही बाजारात चांगली आवक होऊन शेतकऱ्यांना भावही चांगला मिळाला. तुरीला आणि सोयाबीनला ७००० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. हे भाव विक्रमी ठरले. -- विष्णुदास बियाणी, अडत व्यापारी, बीड.
-----------
लॉकडाऊनमुळे मोंढ्यात आवक साधारणच राहिली. त्याचबरोबर वाहतुकीवरही परिणाम झाला. यंदा ७० टक्के ज्वारीचा दर्जा घसरलेला होता. कॅटलफीडसाठी विक्री होईल. शेतकऱ्यांना सगळ्याच वाणाचे भाव चांगले मिळाले. - आनंद पगारिया, अडत व्यापारी, बीड.
-----------
बाजारात चना विकला. चांगला भाव मिळाला. सर्वच शेतमालाचे बाजारभाव शेतकऱ्यांना समाधान ोणारे ठरले. मात्र, अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याने पिकांचा दर्जा कमी झाला. - अण्णाभाऊ घुगे, शेतकरी, गुंजाळा ता. बीड.
--------
पाच एकरांत ज्वारीचे २२ क्विंटल उत्पादन निघाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी काही प्रमाणात काळवंडली आहे. भाव चांगला मिळताच मोंढ्यात विकणार आहे. - तुकाराम घरत, शेतकरी, साखरे बोरगाव, ता. बीड.
----------
महिन्यात झालेली आवक क्विंटलमध्ये
ज्वारी - ३०००
बाजरी - १५००
चना- १०००
गहू - १५००