बीड : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्चपासून जिल्ह्यातील परमिट रूम, बीअर बार, वाईन शॉप बंद होत्या. तीन महिन्यांनतर वाईन शॉप, बारला परवानगी दिली तरी निर्बंधामुळे परमिट रूम, बार चालकांच्या व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत राहिली. हळुहळु प्रशासनाने निर्बंध आणखी शिथील केल्याने परमिट रूम, बार पुन्हा फुलू लागले. वेळा ठरवून दिल्यानंतर काही दिवस पालन झाले. मात्र नंतर परमिट रूम, बार चालकांनी तसेच ग्राहकांनी कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले. रात्री उशिरापर्यंत बीअर बार, वाईन शॉप ग्राहकांची मद्य तहान भागवित आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांकडून कारवाया केल्या जात आहे. वर्षभरात अवैध दारू विक्रीप्रकरणी ३५ पेक्षा जास्त कारवाया करण्यात आल्या. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार चालकांवर कारवाई करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर मिळलेले खुलासे व उत्तरानंतर दंडात्मक अथवा निलंबनाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले जातात. ३० जानेवारीपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांमुळे सर्वच व्यवसायात वेळेचे पालन होत असताना बार चालकांकडून पालन होत नसल्याचे दिसते. मागील आठवड्यात ग्रामपंचायत निवडणूक काळात शहराबाहेरील बार पहाटेपर्यंत सुरू होते. ----
जिल्ह्यात बारची संख्या ३८०
वाइन शॉपची संख्या १२
---
इतर व्यवसायांप्रमाणे वाइन शॉप, बार रूम चालकांनाही नियम घालून दिले आहेत. तरीही बार चालकांकडून आवश्यक त्या सुविधा पाहिजे तेव्हा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने मदिरा शौकिनांचं चांगभलं सुरू आहे.
नगर रोड, बार्शी रोडवरील बार रात्री एक वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. जालना रोडवरील बारमध्ये रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत वर्दळ असते. काही बारचे समोरून बंद तर पाठिमागून सुरू असतात. उशिरा मद्य उपलब्ध होत असल्याने ग्राहकही जादा पैसे मोजतात.
शहरी भागातील वाइन शॉप, बार मात्र दहा वाजेपासूनच बंदची तयारी करतात. ११ वाजेनंतर बंद होतात. या ठिकाणी वर्दळही कमी पहायला मिळाली.
कोरोना बाबतचे नियम पाळणे महत्वाचे असताना जवळपास सर्वच बारमध्ये या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
----------
लॉकडाऊन काळात शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्व अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाकडून वेळोवेळी अचानक तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाते. वेळमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ कारवाया करण्यात आलेल्या आहेत. -- नितीन धामिर्क, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड.
-------
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, तसेच वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिलेल्या आहेत.
---------