संजय खाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : कोरोना लॉकडाऊन असल्याने परळी रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या व येणाऱ्या विशेष रेल्वे गाडीत गेल्या पंधरा दिवसात प्रवाशांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त घटली आहे. त्याचा रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या सहाच गाड्या सुरू असून चार गाड्या बंद आहेत.
परळी मार्गे शिर्डी-काकीनाडा, काकीनाडा-शिर्डी, बंगळरू-नांदेड, नांदेड-बंगळरू, औरंगाबाद- हैद्राबाद, हैद्राबाद-औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. आठवड्यातून एकदा कोल्हापूर -धनबाद ही रेल्वे सुरू आहे. पनवेल -नांदेड, नांदेड-पनवेल व कोल्हापूर-नागपूर व नागपूर-कोल्हापूर या रेल्वे गाड्या काही दिवसापासून बंद आहेत, अशी माहिती रेल्वेे सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
चालू असलेल्या रेल्वे गाड्यांच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या परळी रेल्वे स्थानकातून दररोज तीन रेल्वे गाड्या येतात आणि जातात. यातील एका डब्यात साधारण दहा प्रवासी प्रवास करीत आहेत. पूर्वी एका डब्यात सत्तर प्रवासी जात होते. कोल्हापूर-नागपूर ही विशेष रेल्वे गाडी आठवड्यातून दोन वेळा परळी रेल्वेस्टेशन मार्गे धावत होती. ही रेल्वे पंधरा दिवसापासून बंद आहे. कोरोनाच्यामुळे मार्च २०२० मध्ये कोल्हापूर-नागपूर ही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. ती रेल्वे ६ मार्च २०२१ पासून सुरु झाली होती. आता पुन्हा बंद आहे.
...
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी राज्य, परराज्यातून रेल्वेने भाविक मोठ्या प्रमाणात येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व मंदिर बंद असल्याने रेल्वेने येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या शून्यावर आली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरातील व्यावसायिक, पौरोहित्यावर तर उपासमारीची वेळ आली आहे. कोरानाचा त्यांना जबर फटका बसला आहे.
- नितीन राजूरकर, पौराहित्य, वैद्यनाथ मंदिर.