लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : वारंवार नोटीस बजावूनही कर न भरल्यामुळे नगर पालिकेने सार्वजनिक बांधकाम व गटसाधन केंद्राला कुलूप ठोकले. या कारवाईने कर थकविणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.
माजलगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे १२ लाख ७१ हजार ५३४ रूपयांची थकबाकी आहे. तर गटसाधन केंद्राकडे १० लाख ८ हजार ८८४ रूपये थकले आहेत. याबाबत दोन्ही कार्यालयांना रितसर नोटीसा बजावल्या, परंतु त्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर मंगळवारी दुपारी पालिकेने कार्यालयात जाऊन दोन्ही कार्यालयांना कुलूप ठोकले.
त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता. कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत सूर्यवंशी, वसुली प्रमुख प्रल्हाद वक्ते, शिवहर शेटे, हमीद बागवान, भगवान कांबळे, प्रकाश शिंदे, विनोद टाकणखार, अनंता काळे, सुभाष होके आदींचा समावेश होता. याबाबत सहाल चाऊस म्हणाले, शहरातील अनेक कार्यालयांकडे पालिकेची बाकी असून ती भरण्यास ही कार्यालये टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे थेट टाळे लावण्याची कार्यवाही करण्यात आली. कार्यालयांसह नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.