बीड : लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होणार की नाही, अशी चर्चा होती; परंतु, युतीची अचानक घोषणा केली. यावेळीही त्याचप्रमाणे घोषणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
येथील विश्रामगृहावर सकाळी झालेल्या या पत्रपरिषदेस पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांनी युतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या होत्या; परंतु आमची युती झाली. यावेळीही तसेच होईल. युतीसाठी वातावरण पोषक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांच्या संदर्भात ते म्हणाले, १५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता ही मंडळी स्वत:शीच संवाद करीत राहिली. त्यामुळे जनतेने निवडणुकीत त्यांचा पर्दाफाश केला. आमच्या या महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. काँग्रेसची संवाद यात्रा तर मंगल कार्यालयातून सुरू झाली आणि त्यांच्या सभा छोट्या-छोट्या सभागृहातून होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल. विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, मेटे यांच्या भूमिकेवर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मी स्पष्ट बजावले होते. बीड जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही तुम्ही आमच्यासोबत प्रचार करू नका, असे तेव्हा त्यांना सांगितले होते. त्यांचे किती बळ होते, हेही आपण लोकसभा निवडणुकीत बघितले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
मराठवाड्यात दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पांतर्गत धरणे जोडण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी १० हजार ८०० कोटींच्या पहिल्या टप्प्यास सुरुवातही झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी १ हजार १७९ कि.मी.ची पाईप लाईन असलेल्या ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल. कोकणातून वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. यापैकी २५ टीएमसीच्या योजनेचा डीपीआरही तयार झाला आहे. कृष्णाचे पाणी मराठवाड्यासाठी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे आष्टी, पाटोदा परिसरास त्याचा फायदा होईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.