बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणात पाच जणांना गुरुवारी मध्यरात्री अटक करुन जामिनावर सुटका करण्यात आली. शुक्रवारी आणखी दोघांना अटक केली. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
२७ मार्च रोजी भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदवला होता. सुनावणीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. याच दरम्यान भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेराव करुन त्यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधरसह संतोष राख, बंटी फड व अनोळखी २० ते २५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजीनगर पोलीस व विशेष पथके रवाना केली. गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद येथून गलधरसह संग्राम बांगर, अमोल परळकर, मोहम्मद अझरोद्दीन मोहम्मद सलीम, शेख इरशाद शेख रज्जाक या पाच जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांकडे स्वाधीन केले. या सर्वांची चौकशी करुन त्यांची जामिनावर सुटका केली. शुक्रवारी सायंकाळी सुनिल दत्तात्रय मिसाळ व संदीप शेषराव उबाळे यांना बीड शहरात अटक केल्याचे शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. शिवलाल पुर्भे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दुसऱ्या गुन्ह्यात दोघे ताब्यात; एकाला जामीनयाच दिवशी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जमावबंदी असताना गोंधळ घातल्याप्रकरणी स्वप्नील गलधर, बाबरी मुंडे सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. च्यामध्ये संग्राम बांगर व मोहम्मद अझरोद्दीन मोहम्मद सलीम या दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये थेट सहभाग दिसत नाही. त्यामुळे चौकशी करुन इतर आरोपींना अटक केली जाईल, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले. या गुन्ह्यातील संशयित बाबरी राजाभाऊ मुंडे यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.