- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : माजलगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नियूक्ती केलेली असतानाही कामचुकारपणा करून कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. निरीक्षकांनी रविवारी अचानक भेटी दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. अहवाल मिळाल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे निलंबन करावे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.
माजलगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम.एल.चव्हाण यांची माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव, माजलगाव ग्रामीण व गंगामसला या कार्यक्षेत्रात भरारी पथकात नियूक्ती केलेली आहे. रविवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास अचानक निवडणूक निरीक्षकांनी पाहणी केली. यावेळी चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी घरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांचाच वाहनचालक सुभाष कोळसे हे सुद्धा कर्तव्यावर हजर नव्हते. यावर तात्काळ निरीक्षकांनी अहवाल तयार वरिष्ठांकडे पाठविला.
याबरोबरच माजलगाव-पाथरी रोडवर सोमठाणा येथे बैठे तपासणी पथक नियूक्त केले आहे. याठिकाणी पाहणी केली असता पोलीस शिपाई तावरे हे गैरहजर होते. पथक प्रमुख तथा गटशिक्षणधिकारी सय्यद नजीब मतीन यांना विचारले असता त्यांनी तावरे हे आलेच नसल्याचे सांगितले. या दोन्ही प्रकरणाचा अहवाल तयार करून निरीक्षकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यांनी याची गंभीर दखल घेत त्यांचे निलंबन करावे, असे पत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. त्यामुळे निवडणूक काळात हलगर्जी व कामचुकारपणा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.