- दीपक नाईकवाडे
लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यासोबतच नोटाबंदी, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातील भरघोस दरवाढीसह डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. महागाई कमी करू, बेरोजगारांना नोकरी देऊ, शेतीमालास हमी भाव देऊ, काळे धन देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रु पये जमा करण्याच्या आश्वासनाचे मुद्दे या निवडणुकीत कळीचे ठरणार आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे गाव असलेल्या सारणी (आ.), ता. केज येथील मतदारांना काय वाटते?
गेल्या चार वर्षांत सरकारने चुकीचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. नोटाबंदीने सर्वसामान्यांना झळ बसली असून, महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने याचा फटका महिन्याच्या आर्थिक नियोजनावर बसला आहे. - संगीता सोनवणे
खासदारांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे निवडणुकीत मत मागण्यापुरता येणारा खासदार काय कामाचा? -राज थोरात
ग्रामीण भागात साखर कारखाना उभा करून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून विकासाला चालना देणाऱ्या स्थानिक नेतृत्वास मतदान करू. -प्रशांत सोनवणे
पाच वर्षांत सरकारच्या कारकीर्दीत महागाई वाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीने घर चालणे अवघड झाले आहे. दरवाढीने व महागाईने सर्व सामान्यांना अच्छे दिनऐवजी बुरे दिनच आले आहेत. - रहीम शेख
गावात विकासाचे चक्र फिरवत सर्वसामान्यांच्या मदतीला तत्परतेने धावून येणाऱ्या व गावाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या नेतृत्वालाच मत देणार आहे. -हसिना शेख
गावच्या विकासाला चालना देणारा खासदार असावा. त्यामुळे गावचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या उमेदवारास मतदान करणार आहे. -सूर्यभान सोनवणे
गावाचा सर्वांगीण विकास करीत गावात विकासगंगा आणणाऱ्यांनाच मत देणार आहे. - सारिका सोनवणे
सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकडे लक्ष दिले नाही. सरकारने उद्योगपतींना सक्षम करण्यासाठी भर दिला. ग्रामीण भागातील जनतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील. - जनक सोनवणे