माजलगाव : शहरातील आझाद नगर येथील धारूर रोड ते बायपास या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असताना नगरपालिकेचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने गुरुवारी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने चिखलात बसून नगरपालिकेच्या विरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
शहरातील आझाद नगर हा महत्त्वाचा भाग असून या ठिकाणी बहुसंख्य गरीब, मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवणारे तसेच गरीब घटकातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागाकडे राजकीय मंडळी व नगर पालिकेचे दुर्लक्ष असते. शहरातील सर्व भागातील डी. पी. रोड पूर्ण झाले आहेत. मात्र धारूर रोड ते बायपास हा आझाद नगर येथील डी. पी. रोड अद्याप झाला नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे व पाणी साचलेले असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून ये - जा करावी लागते. शिवाय हा रस्ता कोर्ट, बाजार, मंदिर, स्मशानभूमी व शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यास जोडणारा आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने या भागातून पायी चालणे मुश्कील होत आहे.
आजपर्यंत लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने अनेक वेळा याबाबत निवेदने व वेळोवेळी पाठपुरावा करूनही जलवाहिनी व सिमेंट रस्ता न झाल्याने आझादनगर येथे त्याच रस्त्यावर चिखलात बसून लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
या आंदोलनाची दखल घेत तांत्रिक बाबी पूर्ण करून हा रस्ता व या भागातील समस्या लवकरच सोडवण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी दिले. यावेळी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी दीपक मुंडे व नगरसेवक सुशांत पौळ उपस्थित होते. त्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
याच मागण्यांसाठी याच ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने मागील वर्षी असेच आंदोलन केले होते. हे आंदोलन थांबवण्याची विनंती करून नगर पालिका प्रशासनाने लेखी आश्वासनही दिले होते.मात्र, त्या आश्वासनाचा नगर पालिकेला विसर पडला होता. त्यामुळे पुन्हा आंदोलन करावे लागल्याचे सांगून आश्वासनांची पूर्तता न केल्यास यापुढे मोठे आंदोलन करण्याचा इशारा सय्यद सलीम यांनी दिला.