परळी (बीड ) : अंबेजोगाई रस्त्यावर परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गाचे काम अत्यंत मंद अवस्थेत सुरु आहे. तसेच याचे काम दर्जाहिन होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप आहे. गणेशोत्सवा दरम्यान या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहरात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.
मागील १४ महिन्यांपासून परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गाचे काम अत्यंत मंद गतीने सुरु आहे. यातच हा मार्ग दोन्ही बाजुने खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक वाहनचालकांनी मार्गच बदलला आहे. यामुळे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ता रोको आंदोलनही केले. तसेच हे काम बोगस होत असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केली.
शहरातील गणेशोत्सवाचा काळात या मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने वेगळीच शकल लढवली आहे. शहरातील अंबाजोगाई-परळी रोडवर त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र यावर रस्ता दुरावस्थेचे नम्र विनोदी ढंगात वर्णन सुद्धा केले आहे. पोस्टरवर, '' भक्तानो, अंबेजोगाई-परळी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उशीर लागला यायला ! गडकरी साहेब जरा लक्ष घाला, ही माझे पिता प्रभु वैद्यनाथाची नगरी आहे...! असा मजकूर लिहिला आहे. असे पोस्टर अंबाजोगाई रोडवरील वैद्यनाथ महाविद्यालय, आझाद चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर व अन्य ठिकाणी लावण्यात आले असून ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.