अंबाजोगाई : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयांमध्ये या नियमांचा विसर पडलेला दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या रिकाम्या झाल्या आहेत, तर काही ठिकाणी अडगळीला पडलेल्या आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करीत नाहीत. तसेच कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीलाही मास्कचा वापर करण्यास सक्ती केली जात नाही.
शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची मोठी संख्या आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हरभरा काढणी सुरू
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामाचा हरभरा काढण्यासाठी मोठी लगभग सुरू झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव, ममदापूर पाटोदा, राडी, कुंबेफळ, सातेफळ, अकोला, तडोळा, धानोरा, अंजनपूर, कोपरा व परिसरात हरभऱ्याची काढणी सुरू आहे. आठवडाभरापूर्वी वादळी पाऊस झाल्याने या पावसात अनेक शेतकऱ्यांचे हरभरे भिजले होते. आता ऊन पडल्याने व पुन्हा पावसात हरभरे भिजू नये यासाठी हरभरा काढण्याची लगभग सुरू झाली आहे.
धोक्याची भीती
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरीत्या हाताला पोहोचतील अशा अवस्थेत आहेत. यातील अनेक डीपींचे दरवाजे तुटून वर्षानुवर्षाचा कालावधी लोटला तरी त्या डीपींना दरवाजे बसले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन, हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीषण स्थिती असतानाही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
संत गाडगेबाबा यांना अभिवादन कार्यक्रम
अंबाजोगाई : राष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणारे व समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक तानाजी देशमुख, शालेय समितीचे सदस्य व शिक्षक यावेळी उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भाजीपालावर्गीय पिकांना फटका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतातील पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच दररोज असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, याचा मोठा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांना बसू लागला आहे. परिणामी बाजारातही भाजीपाल्यांचे भाव उतरलेल्याच अवस्थेत आहे.
------