बीड : बहिणीच्या लग्नासाठी एटीएममधून काढलेले ४० हजार रुपये ऑनलाइन जुगारात हरल्यानंतर कुटुंबीयांच्या भीतीने एका २५ वर्षीय तरुणाने औरंगाबादेतून पळ काढला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, तरुणाने आपल्याला किडनॅप केले असून पैसे काढून घेतले असल्याचा फोन बीडच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईलहून केला. यानंतर औरंगाबाद पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला ताब्यात घेतले अन् सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.
औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात १३ जानेवारी रोजी २५ वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नोंदवली. या तरुणाची पोलिसांनी सगळी माहिती काढली असता त्याने एका एटीएम मधून बहिणीच्या लग्नासाठी म्हणून बहिणीच्या बँक खात्यातील ४० हजार रुपये काढले होते असे समोर आले. दरम्यान, अधिक तपासादरम्यानच शुक्रवारी (दि. १५) त्या तरुणाने कुटुंबीयांना फोन करून आपले औरंगाबादच्या कॅनॉट परिसरातून एका चारचाकी वाहनातून अपहरण झाले असून आपल्याला मारहाण करून सर्व पैसे काढून घेतले गेले असल्याचे सांगितले.
पुंडलिकनगरच्या पोलिसांनी युवकाने सांगितलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले असता अशा प्रकारे कोणत्याही युवकाचे अपहरण झाले नसल्याचे समोर आले. दरम्यान, ज्या मोबाईल क्रमांकावरून त्याने फोन केला होता त्या क्रमांंकाची अधिक माहिती घेतली असता तो बीडच्या वाहतूक शाखेतील एक पोलीस कर्मचारी संजय रामराव भुतके यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी घटनेची माहिती बीड पोलीस, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांना दिली. यानंतर त्या युवकाला बीड पोलिसांनी ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले. हा युवक १४ जानेवारी रोजी बीड बसस्थानकावरील वाहतूक शाखेच्या चौकीत आला आणि आपणास महत्त्वाचा फोन करायचा आहे, असे सांगितले. चौकशी करून भुतके यांनी फोन करू दिला. या तरुणाचे काही फोन नंबर पोलिसांच्या निगराणी खाली होते. जेव्हा त्याने फोन केला, तेव्हा पोलीस चौकीतील फोनची चौकशी केली तेव्हा अपहरणाचे नाट्य रंगविणारा हा युवक असल्याचे लक्षात आले. संजय भुतके यांनी त्यास बीड बसस्थानकावरून ताब्यात घेतले.
किंग काँग जुगार हरला
एटीएममधून पैसे काढून तो तरुण ऑनलाइन किंग कॉँग नावाचा जुगार खेळला. यात तो ४० हजार रुपये हरला. त्यानंतर त्याने आपण कुटुंबीयांना काय सांगायचे म्हणून स्वत:च अपहरणाचा बनाव केल्याचे चौकशीत समोर आले.
पुणे, सोलापूर, बीड
दरम्यान, औरंगाबादहून निघून तो तरुण पुण्याला पोहोचला, तिथून तो सोलापूरला आला आणि तिथून बीडला आला. त्याने १३ ते १४ जानेवारीदरम्यान सतत प्रवास केला. बीडमधून फोन केल्याने तो सापडला.