बीड : आठवड्यात ३० ते ४० टन विविध जातीच्या आंब्यांची आवक येथील फळांच्या ठोक बाजारात होत आहे. वाढते तापमान आणि मोठी आवक यामुळे केशर आंब्याचा भाव ७० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. भाव आवाक्यात असल्याने यंदा घरोघरी रोज लालबाग व केशर आमरसाच्या मेजवानीवर ताव मारला जात आहे. जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसामुळे आंब्याला मोठा आधार झाला. बहुतांश ठिकाणी जानेवारी - फेब्रुवारीत मोहर फुटला; मात्र नंतरच्या कालावधीत अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले. तरीही इतर राज्यांतून नेहमीप्रमाणे आवक होत असल्याने सर्वच जातीच्या आंब्यांची चव चाखायला मिळत आहे. कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून बीडमध्ये आंब्यांची आवक होत आहे. बंगळुरू हापूस, लालबाग केशर तसेच हापूस, पायरी, बदाम जातीचे आंबे येथील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन असलातरी शासनाने सवलत दिल्याने विक्रेते आणि ग्राहकांना आंबे सहज उपलब्ध होत आहेत.
मागील लॉकडाऊन काळात रत्नागिरी, देवगड व कोकणातील अन्य ठिकाणांहून हापूस आंबे मागवून व्यापार केला होता; मात्र यंदा हापूसचा दर उंच राहिल्याने अशी विक्री करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली. अनेक शेतकऱ्यांनी तर शासन योजनेतून तसेच स्वबळावर कलमी आंब्याच्या बागा फुलविल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आंब्यांच्या माध्यमातून अर्थार्जन होत आहे.
आंब्यांचे दर यंदाचे (प्रतिकिलो)
कर्नाटक हापूस १०० - १२०
गुजरात केशर ७० - ८०
लालबाग ४० - ५०
अवक, ग्राहकी चांगली
मागील वर्षी लॉकडाऊनमुळे वाहतूक तसेच बाजारपेठा बंद राहिल्याने आवक कमी झाल्याने कर्नाटक हापूसचे दर १८० ते २०० रुपये, गुजरात केशर ८० ते १२० तर लालबाग आंबे ७० ते ८० रुपये किलो होते. संचारबंदीमुळे ग्राहकीदेखील घटली होती; मात्र यंदाच्या लॉकडाऊनमध्ये कृषीमाल विक्री तसेच वाहतुकीला परवानगी असल्याने यंदा बीडमध्ये तिन्ही राज्यांतून आंब्यांची चांगली आवक होत आहे. तसेच स्थानिक आंबे बाजारात दाखल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्याने ग्राहकांना खरेदी सुलभ झाली असून, मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
-----
मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी लॉकडाऊनमध्ये विक्री, वाहतुकीसाठी मुभा दिल्याने बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. वाहतुकीत तसेच विक्रीत अडथळा नसल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावेळी आंब्यांचा व्यापार चांगला होत आहे.
- हरुण अब्बास बागवान, फळांचे ठोक व्यापारी, बीड.
----------------
लॉकडाऊनमध्ये तीन ते चार तास सवलत मिळाल्याने आम्हाला ठोक बाजारातून खरेदीपासून किरकोळ विक्रीपर्यंत सुलभता आली. मागील लॉकडाऊनपेक्षा यंदा व्यापार चांगला झाल्याने उपासमारी टळली.
- इकबाल बागवान, फळांचे किरकोळ व्यापारी, बीड.
--------------
माझ्याकडे गावरान तसेच केशर, बदाम आंब्यांची बाग आहे. परंतु अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे आंब्यांचे अतोनात नुकसान झाले. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झाली, आणि भावही कमी मिळत आहे.
- अण्णा महाराज धुताळ, वडवणी.
------------
आंबे उतरविण्याचे काम सुरू आहे. गवतामध्ये नैसर्गिकरीत्या पिकवून बाजारात विकणार? आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे आंब्याला पाहिजे तेवढी ग्राहकी मिळत नाही. दोन तासांच्या सवलतीमध्ये किती आंबे विकणार? अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फळांवर परिणाम झाला आहे.
- राज धस, बीड.
-------