बीड : सोशल मीडियातून ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् फोनवरून बोलणे सुरू झाल्यानंतर ते दोघे एकमेकांत गुंतत गेले. अखेर त्याने एक दिवस पश्चिम बंगालहून बीडला येऊन अल्पवयीन मुलीला पळविले. सहा महिने ते रांची येथे एकत्रित राहिले. या जाेडप्याचा पेठ बीड पोलिसांनी अखेर छडा लावला. २६ रोजी त्या दोघांना घेऊन पोलीस बीडमध्ये पोहोचले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज रंजित भगत (३६, रा. उकरा, ता. आसामसोल, जि. दुर्गापूर, पश्चिम बंगाल) असे त्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी बीडमधील पेठ बीड ठाणे हद्दीतील असून, सहा महिन्यांपूर्वी स्टार मेकर नावाच्या ॲपवरून त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेऊन ते बाेलू लागले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर एक दिवस त्यांनी पलायनाचे नियोजन केले. १४ जानेवारी २०२२ रोजी सूरज भगत बीडला आला. अल्पवयीन मुलीला घेऊन तो पश्चिम बंगालमध्ये पोहोचला. त्यानंतर ते दोघे रांचीत एका ठिकाणी खोली घेऊन राहिले. मजुरीकाम करून ते उदरनिर्वाह भागवत.
इकडे मुलीच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांनी १७ जानेवारी रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड ठाण्याचे सहायक निरीक्षक केदार पालवे यांनी उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, हवालदार सुभाष मोटे व पोलीस नाईक सुनील अलगट यांना पश्चिम बंगालला रवाना केले.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर न्यायालयात प्रवासी रिमांड घेऊन पथक बीडला पोहोचले. मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. तिला बालगृहात ठेवण्यात आले. आरोपी सूरज भगत याला २७ मे रोजी न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अपहरण प्रकरणात ॲट्रॉसिटीचे कलम वाढले आहे.
सहा महिन्यांनी मोबाइल सुरू केला अन्....पेठ बीड ठाण्याच्या पोलिसांनी अपहृत मुलीच्या मोबाइलवरून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद असल्याने तिचे लोकेशन मिळत नव्हते. अखेर तब्बल सहा महिन्यांनी तिने मोबाइल सुरू केला. त्यानंतर २३ मे रोजी पश्चिम बंगालमधून त्या दोघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे १८ मे रोजीच ते रांचीहून गावी पोहाेचले होते.