परळी : परळी शहर हे छोटे नसून मोठे आहे. सामूहिक सोहळ्याचा एवढा मोठा उपक्रम मी पहिल्यांदाच पाहिला. त्यामुळे परळी शहर हे निश्चितच मोठे आहे. आपल्या पत्नीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुख, शांती, समाधानासाठी पत्नीवर प्रेम करावे त्याबरोबरच आपल्या आई-वडीलांचीही सेवा करावी असे आवाहन सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी केले.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत थाटात पार पडला. सिने अभिनेता अक्षयकुमार व्यासपीठावर येताच उपस्थित हजारो नागरिकांनी हात उंचावत स्वागत केले. यावेळी अक्षयकुमार यांनीही दोन्ही हात जोडत उपस्थितांना दाद दिली. अक्षयकुमार यांनी आपल्या या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. नमस्कार असे म्हणत हिंदीतून भाषणास सुरुवात केली. तर काही वेळाने त्यांनी मराठीतूनही भाषण केले. पंकजा मुंडे यांनी सुरु केलेला सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी आयोजित करावा तसेच वर्षातून दोनवेळा आयोजन करण्याची सूचना अक्षयकुमारने केली. अक्षयकुमार यांनी सामुहिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपुर्द केला.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हणाल्या, सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा वाली व वाणी होण्याची शिकवण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे. या शिकवणीपासून श्वासात श्वास असेपर्यंत दूर जाणार नाही. मला मुलगा आहे पण एवढ्या संख्येने कन्यादानाचे भाग्य आपल्याला लाभल्याचे सांगून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिने अभिनेते अक्षयकुमार यांनी उपस्थितीत दर्शवून परळीकरांचा सन्मान वाढविला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.यावेळी वधुवरांना मान्यवरांनी भाषणातुन आशीर्वाद दिले. तसेच राजाराणी कपाट, मनी मंगळसूत्र, जोडवे ही देण्यात आले. ५० हजार लोकांची बैठक व्यवस्था, १५ क्विंटल मोतीचूर लाडुची मेजवाणी या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
पत्नीवर प्रेम, आईवडिलांची सेवा करा -अक्षयकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:52 PM
सुख, शांती, समाधानासाठी पत्नीवर प्रेम करावे त्याबरोबरच आपल्या आई-वडीलांचीही सेवा करावी असे आवाहन सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी केले.
ठळक मुद्देपरळीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा : नवदाम्पत्यांना अक्षयकुमारने दिला प्रत्येकी १ लाखाचा धनादेशरुपी आहेर