बीड : एकुलता एक असल्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. पुढे चालून त्याला दारूचे व्यसन लागले आणि आज तो पंधराव्या वर्षीच पक्का तळीराम शिवाय सराईत मोबाईल चोर बनला. या अल्पवयीन आरोपीला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
महेश (नाव बदललेले) हा बीड शहरातील माळीवेस भागात राहतो. महेश हा एकुलता एक असल्याने त्याचा आई-वडिलांनी खुप लाड केला. परिस्थिती जेमतेम आहे. घरात सर्व काही आहे. मात्र पुढे चालून त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्यातून तो व्यसनी बनला. लाडाचा असल्याने वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याच दुर्लक्षाचा फायदा घेत तो आज सराईत मोबाईल चोर बनला आहे. उघड्या घरांमध्ये प्रवेश करून मोबाईल लंपास करणे त्याची सवय बनली.
साधारण पंधरा दिवसांपूर्वी त्याने स्वराज्य नगर भागातील शितल केदार यांच्या घरातील मोबाईल लंपास केला. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. हा मोबाईल महेशने चोरल्याचे समजले. एलसीबीचे सपोनि अमोल धस यांनी सापळा लावत रविवारी माळीवेस भागात दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या महेशला ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, विकास वाघमारे, गणेश नवले, विष्णू चव्हाण यांनी केली. तपास पोना आर.डी.राऊत करीत आहेत.
पैसे कमी पडत असल्याने चोरीमहेश हा चोरी करीत असल्याचे वडिलांना माहित झाले होते. वारंवार सांगितल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही. दारू व इतर व्यसन पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने चोरीचा व्यवसाय निवडला. मोबाईल विक्री करून तो पैसे मिळवायचा. यापूर्वीही त्याला एक ते दोन वेळेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.