...
लाॅकडाऊनचा फटका
वडवणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे शहरासह तालुक्यात फळबाग, भाजीपाला, फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता बाजारपेठेत भाजीपाला व फळे विक्री होत नसल्याने शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने फळबाग, भाजीपाला विक्रेता, उत्पादकांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
...
ऑफलाईन नोंदणी करून लस देण्याची मागणी
वडवणी : तालुक्यातील वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र व कुप्पा चिचंवण ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्रांवर लस देणे सुरू आहे. पण, लसीचा तुटवडा व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करूनच लस देणे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नोंदणी करून लसीकरण करण्याची वयोवृद्ध नागरिकांची आहे.
..
मशागतीला वेग
वडवणी : तालुक्यातील शेतशिवारात शेतकरी उन्हाळी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. पण, आता शेतकरी वर्ग पुन्हा उन्हाळी मशागतीच्या कामाला लागला आहे. शेतशिवारात नांगरणी, वखरणीचे काम करताना शेतकरी वर्ग पाहावयास मिळत असल्याचे दिसते.
....
उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका
वडवणी : ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. पावसळ्यापूर्वी उघड्या डीपीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
...
बॅरिकेटस् लावून वाहनांची तपासणी
वडवणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शहरातील बीड परळी हायवेवर शिवाजी महाराज चौकात, चिचंवण रोड परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांकडील ई-पास तपासले जात आहेत. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होत आहे.